रिओ येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेनंतर निवृत्तीचे संकेत विश्वविजेता धावपटू उसेन बोल्टने दिले आहेत. बोल्टने बीजिंगमध्ये चालू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत १०० व २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक राखले आणि दिमाखदार कामगिरी केली.
लंडनमध्ये २०१७ साली पुढची जागतिक अॅथलेटिक्स अिजक्यपद स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये भाग घेणार काय, असे विचारले असता बोल्ट म्हणाला, ‘‘या स्पर्धेत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. कदाचित मी ऑलिम्पिकनंतरही निवृत्त होईन. मी आणखी एक वर्ष स्पर्धात्मक अॅथलेटिक्समध्ये भाग घ्यावा अशी माझ्या पुरस्कर्त्यांची इच्छा आहे. पुढच्या जागतिक स्पर्धेबाबत गांभीर्याने विचार होणार नसेल तर मी त्यामध्ये भाग घेऊ नये असे माझ्या प्रशिक्षकांचे मत आहे.’’
आगामी ऑलिम्पिकविषयी बोल्ट म्हणाला, ‘‘जर माझे शरीर आणखी एका मोसमात साथ देणार असेल तरच मी ऑलिम्पिकमध्ये उतरण्याचा निर्णय घेणार आहे. जर मी त्यामध्ये भाग घेतला तर तेथे पुन्हा सुवर्णपदकांची मालिका राखण्यासाठीच मी सराव करीन.’’
बोल्टला अजूनही स्नायूंच्या दुखापतींचा त्रास होत आहे. जागतिक शर्यतीत त्याला जस्टीन गॅटलिनने शेवटपर्यंत चिवट लढत दिली होती. बोल्टने त्याच्यावर निसटता विजय नोंदवला. २०० मीटर शर्यतीत त्याने सलग चौथ्यांदा विश्वविजेतेपद मिळवले आहे.
शर्यत जिंकल्यानंतर बोल्ट हा आनंद व्यक्त करीत असताना येथील इलेक्ट्रिक स्कूटरवरून चित्रीकरण करणाऱ्या एका कॅमेरामनचा तोल गेला आणि तो बोल्टच्या अंगावर पडला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बोल्ट म्हणाला, ‘‘आता मला माझ्या पायांचा विमा उतरावा लागणार आहे. मी नशिबानेच वाचलो. अर्थात असे अपघात होत असतात.’’
‘जगात बोल्टला जमिनीवर लोळवणारा फक्त एकच माणूस आहे, तो म्हणजे हा कॅमेरामन’, अशी टिप्पणी समाजमाध्यमांवर नोंदवण्यात आली आहे.
रिओ ऑलिम्पिकनंतर बोल्टचे निवृत्तीचे संकेत
रिओ येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेनंतर निवृत्तीचे संकेत विश्वविजेता धावपटू उसेन बोल्टने दिले आहेत.
First published on: 29-08-2015 at 04:11 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usain bolt discusses retirement after 2016 olympic games