जगातील सर्वात वेगवान धावपटू असलेल्या युसेन बोल्टने लंडन डायमंड लीगमध्ये धीम्या गतीने सुरुवात केली तरी या मोसमातील सर्वोत्तम वेळ नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरले. बोल्टने ९.८५ सेकंद अशी वेळ देत पुढील महिन्यात मॉस्को येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचा इशारा त्याने प्रतिस्पध्र्याना दिला आहे. अमेरिकेचा मायकेल रॉजर्सने दुसरा (९.९८ सेकंद) तर जमैकाच्या नेस्टा कार्टरने (९.९९ सेकंद) तिसरा क्रमांक पटकावला.
ऑलिम्पिक स्टेडियममध्ये १०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरी साकारली तरी सुधारणेला अद्याप बराच वाव आहे, असे जमैकाचा महान धावपटू युसेन बोल्टने मान्य केले. शर्यत जिंकल्यानंतर बोल्टने स्टेडियमला फेरी मारून आपल्या नेहमीच्या शैलीने प्रेक्षकांना खूश केले. आपल्या कामगिरीविषयी बोल्ट म्हणाला, ‘‘जागतिक स्पर्धेत मी अशी सुरुवात केली तर मी पाचव्या क्रमांकापर्यंत मजल मारू शकेन. त्यामुळे अधिक आक्रमक सुरुवात करण्यासाठी मला माझ्या प्रशिक्षकासोबत चर्चा करून मेहनत घ्यावी लागणार आहे. मी चांगली सुरुवात करू शकत नसल्यामुळे मी धावण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला प्रशिक्षकांनी मला दिला आहे. मॉस्को येथील स्पर्धेत मी सरस कामगिरी करेन, अशी आशा आहे.’’
‘‘लंडनमध्ये यायला मला नेहमीच आवडते. चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच मला अधिक जोमाने धावण्याची प्रेरणा मिळते,’’ असेही त्याने सांगितले. पहिल्या ५० मीटरमध्ये धीम्या गतीने सुरुवात करणाऱ्या बोल्टने नंतरचे ५० मीटरचे अंतर वेगवान पळून पार केले.