घरची आर्थिक स्थिती हलाखीची, बेताची असली तरी आपल्याकडे असलेले असामान्य कौशल्य दाखवत सन्माननीय मार्गाने त्यावर मात करता येते. हेच तत्त्व जमैका व आफ्रिकन देशांच्या खेळाडूंनी साऱ्या जगाला दाखवून दिले. अ‍ॅथलेटिक्स हा पदकांची लयलूट करण्याचा खजिना मानला जातो. आफ्रिकन देशांच्या खेळाडूंनी त्याचे महत्त्व ओळखले आणि ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. दुर्दैवाने त्याचे महत्त्व भारतीय खेळाडूंना अजून तरी ओळखता आलेले नाही. इतर देशांचा आदर्श आपण केव्हा घेणार हीच खरी समस्या आहे.
विजेतेपद मिळविण्यापेक्षा ते टिकविणे अधिक कठीण मानले जाते. युसेन बोल्ट व शैली फ्रेझर या जमैकाच्या धावपटूंबाबत ही गोष्ट खूपच सोपी आहे. जागतिक स्पर्धेत या दोन्ही धावपटूंनी वेगवान धावपटूंच्या शर्यतींमध्ये अजिंक्यपद राखताना आपल्या अतुलनीय कामगिरीचा प्रत्यय घडविला. ‘लंबी रेस का घोडा’ मानल्या जाणाऱ्या जमैकाच्या या धावपटूंची कामगिरी विचारात घेतली तर भारतीय धावपटू अद्याप बरेच मागे आहेत, असेच म्हणावे लागेल.
जागतिक स्तरावरील अ‍ॅथलेटिक्समध्ये बोल्टने अपेक्षेप्रमाणे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १०० व २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक राखले. त्याचीच सहकारी फ्रेझरने बोल्टच्या कामगिरीचा कित्ता गिरविताना १०० व २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत विजेतेपद मिळविले. या दोन खेळाडूंबरोबरच मोहम्मद फराह, बोदान बोंदारेन्को, एडना किपलगाट, येलेना इसिनबायेव्हा यांनीही आपल्या पराक्रमाचा ठसा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये उमटविला. केनिया व इथिओपियाच्या धावपटूंनी मॅरेथॉन शर्यतींमध्ये वर्चस्व गाजविताना अतुलनीय कामगिरी केली.
धावपटूंचा खजिना!
जमैकामध्ये धावपटूंचा खजिना आहे. त्यांच्याकडे होणाऱ्या शालेय गटाच्या राष्ट्रीय स्पर्धाना दहा हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांची उपस्थिती असते. भारतात मात्र ही परिस्थिती वेगळी आहे. पुण्यातील आशियाई मैदानी स्पर्धेला प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर शाळांच्या सहली आयोजित करून त्याद्वारे प्रेक्षक जमविण्याचा प्रयत्न केला गेला. आपल्याकडे असलेल्या गुणांद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविली की प्रसिद्धी व पैसा आपोआपच मिळू शकतो, हे जमैकाच्या खेळाडूंनी ओळखले आहे.
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धासाठी ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीचे पात्रता निकष आहेत. आपले धावपटू ‘ब’ श्रेणीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत त्याप्रमाणे सरावाचे नियोजन करत असतात. मात्र जमैका, केनिया, इथिओपिया आदी देशांमध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्द करू इच्छिणाऱ्या धावपटूंपुढे ‘अ’ श्रेणी पात्रता निकष डोळ्यासमोर ठेवले जातात व त्याप्रमाणे सरावाचे नियोजन केले जाते. बोल्टने बीजिंग (२००८) व लंडन (२०१२) या दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धामध्ये शंभर व दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतींत सुवर्ण कामगिरी केली होती. बर्लिन (२००९) येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत त्याने याच दोन्ही शर्यतींमध्ये अजिंक्यपद मिळविले होते. साहजिकच यंदाच्या जागतिक स्पर्धेत तो या पराक्रमाचा कित्ता गिरविणार की नाही, याची उत्सुकता निर्माण झाली होती. बोल्टने आपल्या नावलौकिकाला साजेसे यश मिळविताना मॉस्को येथील जागतिक स्पर्धेत पुन्हा या दोन्ही शर्यतींचे अजिंक्यपद मिळविले.
फ्रेझरला बीजिंग व लंडन ऑलिम्पिकमध्ये फक्त शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीचे अजिंक्यपद मिळविता आले होते. लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने दोनशे मीटर शर्यतीत रौप्यपदक मिळवले होते. मॉस्को येथे यंदाच्या जागतिक स्पर्धेत तिने शंभर व दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतींचे विजेतेपद मिळविले.
फराहची कमाल!
आपले दाहीदिशा दारिद्रय़ संपवायचे असेल तर आपल्याकडील अ‍ॅथलेटिक्सचे कौशल्य आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखविले पाहिजे, हा विचार मनाशी बाळगून मोहम्मद फराह या सोमालियाच्या धावपटूने इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. त्याने लंडन ऑलिम्पिकमध्ये पाच हजार व दहा हजार मीटर धावणे या दोन्ही शर्यती जिंकल्या. साहजिकच जागतिक स्पर्धेत त्याच्याबाबत उत्कंठा निर्माण झाली होती. त्याने मॉस्को येथेही याच यशाची पुनरावृत्ती केली. लांब पल्ल्याच्या शर्यतींमध्ये त्याने दोन क्रीडा प्रकारात आफ्रिकन देशांच्या मक्तेदारीला काही अंशी धक्का दिला आहे. बोंदारेन्कोने उंच उडीत अजिंक्यपद राखताना ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने स्पर्धेत विश्वविक्रमही नोंदविला.
पोल व्हॉल्टसारख्या अवघड क्रीडा प्रकारात वर्चस्व राखणारा सर्जी बुबका याचा आदर्श ठेवून सराव करणाऱ्या इसिनबायेव्हाने अनेक सुवर्णपदकांची लयलूट केली आहे. मॉस्को येथेही घरच्या प्रेक्षकांना तिने नाराज केले नाही. पाच मीटरपेक्षा अधिक उंची पार करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. तिने सुवर्णपदक जिंकून घरच्या प्रेक्षकांना खूश केले मात्र समलिंगी खेळाडूंच्या स्पर्धेवर बंदी घालावी यासाठी तिने समर्थन करीत वादंग निर्माण केला. या वादंगामुळेच तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.   
संयोजनात अग्रेसर!
राष्ट्रकुल स्पर्धेतील भ्रष्टाचारप्रकरणी गोत्यात आलेले आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्षपद सुरेश कलमाडी यांनी गमावले आणि त्याबरोबर भारतीय संघटकांचेही वर्चस्व संपुष्टात आले. मात्र भारतीय लोक स्पर्धेतील खेळाडूंच्या यशापेक्षा संयोजनात अधिक वाकबगार आहेत, हे पुण्यात झालेल्या आशियाई मैदानी स्पर्धेद्वारे सिद्ध झाले. आयत्या वेळी संयोजनपद मिळूनही ही स्पर्धा भारताने यशस्वीरीत्या आयोजित केली आणि परदेशी खेळाडूंप्रमाणेच प्रशिक्षक तसेच संघटकांकडूनही वाहवा मिळविली. या स्पर्धेत चीन व जपानच्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी भाग घेतला नाही. त्यांचे तिसऱ्या फळीतील खेळाडू सहभागी झाले. त्यांच्या अनुपस्थितीत भारतीय खेळाडूंनी बऱ्यापैकी यश मिळविले. मात्र जागतिक स्तरावर आपण किती मागे आहोत, याचा प्रत्यय लगेचच मॉस्को येथील जागतिक स्पर्धेत दिसून आला. साऱ्या सुविधा व सवलती पायाशी लोळण घेत असताना जागतिक व ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्तीच आपल्याकडे नाही, याचा प्रत्यय पुन्हा आला. परदेशी खेळाडूंच्या सवयींचे अनुकरण करून त्यांच्यासारखी महत्त्वाकांक्षा आपल्या खेळाडूंनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा