जमैकाचा विख्यात धावपटू युसेन बोल्टने सलग तिसऱ्यांदा लॉरियसचा जगातील सर्वोत्तम क्रीडापटू बनण्याचा मान पटकावला. लंडन ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर, २०० मीटर तसेच ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकांची नोंद करणाऱ्या बोल्टने दिग्गज खेळाडूंना मागे टाकत या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. ब्रिटनची हेप्टॅथलॉनपटू जेसिका इन्निस हिने जगातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला. अमेरिकन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या ब्रिटनच्या अँडी मरेने ‘ब्रेक थ्रू’ पुरस्कारावर नाव कोरले. अद्वितीय कामगिरीबद्दलचा पुरस्कार अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्स याला देण्यात आला. लंडन ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष सेबॅस्टियन कोए यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.