‘जगातील सर्वात वेगवान पुरुष’ अशी ख्याती मिरवणारा जमैकाचा युसेन बोल्ट चित्त्यापेक्षाही अधिक वेगाने जेव्हा पळतो, तेव्हा तो नजराणा पाहणे म्हणजे स्वप्नसुखच असते. राष्ट्रकुल स्पर्धेतही बोल्टचा जलवा समस्त चाहत्यांना पाहायला मिळाला. हॅम्पडेन पार्क येथे झालेल्या पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत बोल्टने आपल्या सुसाट वेगाने सर्वानाच मंत्रमुग्ध करत जमैकाला सुवर्णपदक मिळवून दिले.
जेसन लिव्हरमोर, केमार बेली-कोल आणि निकेल अ‍ॅश्मेड यांनी सुरेख कामगिरी करून बॅटन जेव्हा बोल्टच्या हातात दिले. त्यानंतर बोल्टने सर्व प्रतिस्पध्र्याना मागे टाकत जमैकाला सुवर्णपदक मिळवून दिले. सहा ऑलिम्पिक सुवर्णपदके आणि आठ जागतिक सुवर्णपदके मिळवणाऱ्या २७ वर्षीय बोल्टने राष्ट्रकुल स्पर्धेत ग्लासगोमध्ये पहिल्यांदा पदार्पण केले, त्यावेळी त्याने ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत ३७.५८ सेकंद अशी वेळ नोंदवत स्पर्धाविक्रम रचला.
शेवटच्या प्रयत्नांत बोल्ट आणि इंग्लंडचा धावपटू डॅनी टॅबलोट यांच्यात चुरस रंगली होती. स्टेडियममधील सर्वाच्या नजरा यो दोघांवर खिळल्या होत्या. पण बोल्टने टॅबलोटला मागे टाकले. जेतेपदानंतर बोल्टने आपल्या नेहमीच्या शैलीत पोझ देत चाहत्यांना खूश केले. ‘‘सुवर्णपदक माझ्यासाठी नेहमीच विशेष असते. फक्त राष्ट्रकुल सुवर्णपदकाची माझ्या खात्यात कमतरता होती. आज ते स्वप्न पूर्ण झाले,’’ असे बोल्टने जेतेपदानंतर सांगितले. पायाच्या दुखापतीमुळे बोल्ट १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत भाग घेणार नाही.

Story img Loader