Usman Khawaja says My mother calls Warner devil : डेव्हिड वॉर्नरसाठी शनिवारची संध्याकाळ खूप खास होती. ऑस्ट्रेलियाच्या विजयासह त्याने आपल्या कसोटी आणि एकदिवसीय कारकिर्दीचा शेवट केला. वॉर्नरने आधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पाकिस्तानविरुद्धची नवीन वर्षातील पहिली कसोटी त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी होती. यासोबतच त्याने वनडे फॉरमॅटमधूनही निवृत्ती जाहीर केली. यानिमित्ताने डेव्हिड वॉर्नरचा एक खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत वॉर्नर उस्मान ख्वाजाच्या आईला मिठी मारताना दिसत आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा एकमेकांना लहानपणापासून ओळखतात आणि त्यांच्यात खूप घट्ट मैत्री आहे. दोघांनी एकत्र क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि नेट ते स्थानिक क्लब आणि नंतर राष्ट्रीय संघासाठीही एकत्र खेळले. दोघांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले असले तरी त्यांची मैत्री कधीच कमी झाली नाही. आता डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि कारकिर्दीतील शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्यात उस्मान ख्वाजाही त्याचा सलामीचा जोडीदार होता.
उस्मान ख्वाजा आणि वॉर्नर हे बालपणीचे मित्र आहेत आणि दोघेही वयाच्या ६ व्या वर्षापासून एकमेकांना ओळखतात. सिडनी कसोटीनंतर जेव्हा ख्वाजाला त्याच्या आई आणि वॉर्नर यांच्या भेटीबद्दल विचारले गेले, तेव्हा त्याने सांगितले की त्याची आई वॉर्नरला ‘शैतान’ म्हणते. यावर पुढे बोलताना ख्वाजा म्हणाला की, “माझी आई वॉर्नरला तेव्हापासून ओळखते, जेव्हापासून मी त्याला ओळखतो. माझी आई त्याच्यावर खुप प्रेम करत. ती त्याला प्रेमाने ‘शैतान’ म्हणते.”
हेही वाचा – AUS vs PAK : “लोकांनी मला एक…”, कसोटी आणि वनडेमधील निवृत्तीनंतर डेव्हिड वॉर्नरचे मोठे विधान
शेवटच्या मालिकेतही वॉर्नर ठरला सुपरहिट –
डेव्हिड वॉर्नरने त्याच्या शेवटच्या मालिकेत सहा डावांत ४९.८३ च्या सरासरीने २९९ धावा केल्या होत्या. या मालिकेत शतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज होता. ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली. वॉर्नरने गतवर्षी या संघासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी जिंकली होती. त्यानंतर तो इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिका वाचवणाऱ्या संघाचा सदस्य होता. त्याचबरोबर वनडे विश्वचषकात संघाला चॅम्पियन बनवले. वॉर्नर २०१५ मध्ये विश्वचषक विजेत्या संघाचाही सदस्य होता.
हेही वाचा – Ranji Trophy 2024 : बीसीसीआयने अष्टपैलू खेळाडूवर घातली दोन वर्षाची बंदी, जाणून घ्या काय आहे कारण?
वॉर्नरची कसोटी कारकीर्द –
वॉर्नरच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने १११ सामन्यात ४४.५९ च्या सरासरीने ८६९५ धावा केल्या. या काळात त्याने २६ शतके आणि ३६ अर्धशतके झळकावली. १६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ४५.०१ च्या सरासरीने ६९३२ धावा केल्या. त्याने २२ शतके आणि ३३ अर्धशतके केली आहेत.