यंग प्रभादेवी क्रीडा मंडळातर्फे हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेतील प्रथम श्रेणी गटात उपनगरच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाने ठाण्याच्या छत्रपती संघाचा १३-११ असा पराभव करून जेतेपद प्राप्त केले.
अंतिम लढतीत दोन्ही संघांनी प्रारंभी सावध पवित्रा स्वीकारला. पहिल्या सहा मिनिटांत दोन्ही संघांनी गुण कमावला नाही. मग उत्कर्षने खोलवर चढाई करीत पहिला गुण कमावला. छत्रपती संघाने तात्काळ प्रत्युत्तर देत १-१ अशी बरोबरी साधली. दवामुळे मैदान निसरडे होत असल्याने उत्कर्षांने जोरदार आक्रमणाऐवजी सावध खेळ करण्यावर भर दिला. बाराव्या मिनिटाला उत्कर्षने आणखी एका गुण पटकावला. मात्र लगेचच छत्रपती संघाने बरोबरी साधली. मध्यंतराला दोन्ही संघ ५-५ अशा बरोबरीत होते.
विश्रांतीनंतर उत्कर्षने संघाने जबरदस्त चढाई करत तीन गुणांची कमाई करत आघाडी भक्कम केली.  उत्कर्षच्या आघाडीमुळे दडपणाखाली आलेल्या छत्रपती संघाने चांगली चढाई करत दोन गुणांची कमाई केली. मात्र उत्कर्षने चढाईच्या आपल्या ताकदीचा फायदा उठवत आणखी दोन गुण पटकावले. हीच आघाडी निर्णायक ठरली. या आघाडीचा पुरेपूर फायदा उठवत उत्कर्षने छत्रपती संघावर १३-११ अशी मात करत जेतेपदावर नाव कोरले. उत्कर्षतर्फे सागर परब, पुरुषोत्तम प्रभू यांनी शानदार चढाया केल्या. सागर घाटे आणि नीलेश चिंदरकर यांनी नेत्रदीपक पकडी केल्या. छत्रपती संघातर्फे जितेश जोशी आणि अर्जुन शिंदे यांनी आक्रमक चढाया केल्या तर अजिंक्य पाटीलने सुरेख पकडी केल्या. परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
प्रथम श्रेणी गटात सर्वोत्तम चढाईपटू : शैलेश गराडे (अंबिका), सर्वोत्तम मध्यरक्षक : दिनेश वायाळ (छत्रपती), सर्वोत्तम कोपरारक्षक : नीलेश चिंदरकर (उत्कर्ष) आणि सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू : नीलेश काळभोर (सतेज) ठरला.
याचप्रमाणे कुमार गटामध्ये  सर्वोत्तम चढाईपटू : शैलेश पाटील (शिवशक्ती), सर्वोत्तम मध्यरक्षक : अमर निवाते (उत्कर्ष), सर्वोत्तम कोपरारक्षक : नीलेश सकपाळे (अमर हिंद) आणि सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू : अमित चव्हाण (अमर हिंद) ठरला.
यंग प्रभादेवी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
दवात भिजले मॅट!
दवाची समस्या जाणवू शकेल, यासाठी खबरदारी म्हणून संयोजक यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाने मॅटच्या खाली मातीचे क्रीडांगणही तयार केले होते. परंतु स्पध्रेच्या तिसऱ्या दिवसापर्यंत दवाचा कोणताही प्रभाव मॅटवर जाणवला नाही आणि सामने यथोचित पार पडले. मात्र स्पध्रेच्या अखेरच्या दिवशी दवाचा परिणाम तीव्रतेने जाणवला. त्यामुळे कुमार गटाच्या अंतिम सामन्याच्या मध्यंतराला क्रीडांगण बदलावे लागले. याचप्रमाणे दोन्ही अंतिम सामन्यांप्रसंगी संयोजकांना वारंवार दवाचे पाणी पुसावे लागत होते. याप्रमाणे रेषा स्पष्ट करणाऱ्या चिकटपट्टय़ा पुन:पुन्हा चिकटवाव्या लागत होत्या.

Story img Loader