फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेल्या खेळपट्टीवर तन्मय श्रीवास्तव व मुकुल डागर यांनी वैयक्तिक शतकांसह द्विशतकी सलामी केली. त्यामुळेच महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात उत्तर प्रदेशला १ बाद २८७ असा शानदार प्रारंभ करता आला. त्याआधी महाराष्ट्राने ६ बाद ७६४ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला.
गहुंजेच्या सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवरील या सामन्यात तिसऱ्या दिवशीही फलंदाजांनीच वर्चस्व गाजविले. महाराष्ट्राने ५ बाद ७३८ धावांवर पहिला डाव रविवारी पुढे सुरू केला. मात्र कर्णधार रोहित मोटवानी हा १४७ धावांवर बाद झाल्यानंतर महाराष्ट्राने डाव घोषित केला. मोटवानी याने ३२७ मिनिटांच्या खेळांत २२ चौकार मारले. महाराष्ट्राच्या मोठय़ा धावसंख्येचे कोणतेही दडपण न घेता उत्तरप्रदेशच्या श्रीवास्तव व डागर यांनी मनमुरादपणे फटकेबाजी करीत सलामीसाठी ६७.३ षटकांत २४८ धावांची भागीदारी केली. त्यामुळेच उत्तरप्रदेशने महाराष्ट्रास खणखणीत उत्तर दिले.
श्रीवास्तव याने ३३१ मिनिटांच्या खेळात नाबाद १३४ धावा केल्या. त्यामध्ये त्याने १८ चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. डागर याने २८२ मिनिटांच्या खेळांत २२ चौकारांसह १२६ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : ६ बाद ७६४ घोषित (हर्षद खडीवाले ८०, केदार जाधव ३२७, संग्राम अतितकर ८०; भुवनेश्वरकुमार २/११८, पीयूष चावला ३/२३३)
उत्तर प्रदेश (पहिला डाव) : १ बाद २८७ (तन्मय श्रीवास्तव खेळत आहे १३४, मुकुल डागर १२६, महम्मद कैफ खेळत आहे २३; केदार जाधव १/३).

Story img Loader