Vaibhav Suryavanshi for India U-19 Against Australia : इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी (२८ एप्रिल) रात्री खेळवण्यात आलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने धडाकेबाज शतक ठोकून संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. वैभवने अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावत विश्वविक्रम केला. त्याच्या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर १५.५ षटकांत २१२ धावा करत विजय मिळवला. अवघ्या १४ वर्षांच्या या खेळाडूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वैभवला यंदा आयपीएलमध्ये संधी मिळाली असली तरी देशांतर्गत क्रिकेट व भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना त्याने आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं आहे.

दीड वर्षांपूर्वी चंदीगड येथे विनू मंकड चषक ही १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात आली होती. या स्पर्धेवेळी कर्नाटकचे माजी क्रिकेटपटू व्ही. एस. तिलक नायडू यांचं वैभवकडे लक्ष गेलं. तेव्हा तो ११-१२ वर्षांचा दिसत होता. मात्र त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांविरुद्ध चांगलं क्रिकेट खेळत होता. त्याच्यापेक्षा परिपक्व व शारीरिकदृष्ट्य बळकट खेळाडूंबरोबर तो खेळत होता. नायडू यांच्या पॅनेलने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं वैभवकडे लक्ष वळवलं. अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी वैभवला आणखी पुढे ढकललं. २०२४ च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. या स्पर्धेसाठी वैभवची निवड झाली नाही. मात्र लक्ष्मण त्याला पाठिंबा देत राहिले.

एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी हुकली, पठ्ठ्याने कसोटी सामन्यात वेगवान शतक ठोकलं

एनसीएने वैभवच्या क्षेत्ररक्षणाकडे लक्ष दिलं. या काळात त्याला ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. परंतु, त्यानंतर उभय संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवण्यात आले, ज्यामध्ये वैभवला भारतीय संघात स्थान मिळालं. वैभवने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात वैभवने ६२ चेंडूत १०४ धावांची खेळी केली. वैगवान गोलंदाजी व बाऊन्सर्सचा (उसळी) त्याच्या खेळावर काहीच परिणाम झाला नाही. चेपॉकच्या मैदानावर त्याने चार षटकार व १४ चौकार लगावले. तोवर त्याने बिहारच्या वरिष्ठ संघाकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत पदार्पण केलं होतं.

गुजरातविरुद्धच्या सामन्यात वैभवकडून विक्रमांची रांग

वैभव बिहारकडून एक टी-२० सामना खेळला आहे. तरीदेखील राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर १.१ कोटी रुपयांची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतलं. आयपीएल लिलावात खरेदी करण्यात आलेला तो सर्वात युवा खेळाडू ठरला होता. त्यानंतर आयपीएल पदार्पण करणारा सर्वात युवा आणि आयपीएल सामन्यात शतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. तसेच सर्वात वेगवान शतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. यासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.