Vaibhav Suryavanshi scores fastest hundred for India in U19 Tests : कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने अनेक विक्रम रचले. याच्या एका दिवसानंतर भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाच्या १३ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास घडवला आहे. चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या अनधिकृत अंडर-१९ युवा कसोटी सामन्यात वैभव सूर्यवंशीने मंगळवारी भारतासाठी अंडर-१९ कसोटीत सर्वात जलद शतक झळकावले आहे. त्याने पहिल्या डावात अवघ्या ५८ चेंडूत आपले शतक झळकावले.
व्यावसायिक क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. व्यावसायिक क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एका १३ वर्षीय क्रिकेटपटूने शतक झळकावण्याची मोठी कामगिरी केली आहे. यापूर्वी हा विक्रम बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतोच्या नावावर होता. शांतोने १४ वर्षे २४१ दिवस वयाचा असताना सिलहट येथे श्रीलंकेच्या अंडर-१९ विरुद्ध युवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले होते.
कोण आहे वैभव सूर्यवंशी?
वैभव सूर्यवंशी रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये बिहारसाठी पदार्पण केल्यापासून चर्चेत आहे. त्याने मुंबईविरुद्ध पदार्पण केले होते. यावेळी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेनेही वैभवचे खूप कौतुक केले होते. यानंतर तो छत्तीसगडविरुद्ध रणजी सामनाही खेळला. मात्र, दोन्ही डावात त्याला खातेही उघडता आले नाही. वैभवने आतापर्यंत खेळलेल्या दोन रणजी सामन्यात ३१ धावा केल्या होत्या.
हेही वाचा – IND vs BAN : आकाश दीपने विराटच्या बॅटने ठोकले २ गगनचुंबी षटकार, कोहली-रोहितसह गंभीरही चकित, पाहा VIDEO
ताजपूर, समस्तीपूर येथील असलेल्या वैभवने पटेल मैदानावर आपले प्रशिक्षक ब्रजेश झा यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर परिश्रम करून हे स्थान मिळवले आहे. वैभवने सामन्याच्या पहिल्याच दिवशी शानदार फलंदाजी केली होती. तो त्याच्या शतकापासून १९ धावा दूर होता, जे त्याने दुसऱ्या दिवशी सहज पूर्ण केले आणि केवळ ५८ चेंडूत शतक झळकावले. त्याच्या झंझावाती खेळीमुळे, वैभवने अंडर-१९ युवा कसोटीत कोणत्याही भारतीयाकडून सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही केला आहे, तर एकूणच हे कोणत्याही अंडर-१९ फलंदाजाचे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे.
अंडर-१९ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा वैभव हा भारतीय क्रिकेटपटू देखील आहे. त्याने अथर्व तायडेचा ६ वर्ष जुना विक्रम मोडला. त्याने ५८ चेंडूत शतक झळकावले आणि अशा प्रकारे मोईन अलीनंतर युवा कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा दुसरा सर्वात वेगवान फलंदाज ठरला. मोईन अलीने २००५ मध्ये ५६ चेंडूत शतक झळकावले होते.
हेही वाचा – IND vs BAN : रविचंद्रन अश्विनची ऐतिहासिक कामगिरी! आतापर्यंत जगातील कोणत्याच खेळाडूला न जमलेला केला पराक्रम
व्यावसायिक क्रिकेटमध्ये शतक झळकवणारे सर्वात युवा क्रिकेटपटू –
१३ वर्षे १८८ दिवस – वैभव सूर्यवंशी विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-१९, चेन्नई, २०२४ (युवा कसोटी)
१४ वर्षे २४१ दिवस – नजमुल हुसेन शांतो विरुद्ध श्रीलंका अंडर-१९ , सिलहट, २०१३ (युवा एकदिवसीय)
१५ वर्षे ४८ दिवस – बाबर आझम विरुद्ध श्रीलंका अंडर-१९, दांबुला, २००९ (युवा एकदिवसीय)
१५ वर्षे १०५ दिवस – नासिर जमशेद विरुद्ध श्रीलंका अंडर-१९, कराची, २००५ (युवा कसोटी)
१५ वर्षे १६७ दिवस – मेहदी हसन मिराज विरुद्ध श्रीलंका अंडर-१९, मीरपूर, २०१३ (युवा कसोटी)
१६ वर्षे ९२ दिवस – बाबर आझम विरुद्ध वेस्ट इंडिज अंडर-१९, पामर्स्टन नॉर्थ, २०१० (युवा एकदिवसीय)