Vaibhav Suryavanshi Youngest Cricketer In IPL To Score A Century : आयपीएल २०२५ स्पर्धेत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी गुजरात टायटन्सच्या अनुभवी गोलंदाजांवर चांगलाच गरजला. वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३५ चेंडूंचा सामना करत या हंगामातील दुसरं सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. या खेळीदरम्यान त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. तो या स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावणारा युवा फलंदाज ठरला आहे. १४ वर्षांच्या मुलाने आयपीएलमध्ये शतक ठोकणे ही काही छोटी कामगिरी नाही. वैभव सूर्यवंशीमध्ये त्याच्या वयापेक्षा जास्त आत्मविश्वास आणि क्षमता असल्याचं कालच्या खेळामुळे सिद्ध झालं. पण त्याने त्याच्या संपूर्ण यशाचं श्रेय त्याच्या कुटुंबियांना दिलं.

कठोर परिश्रम करणाऱ्यांची देव काळजी घेतो

“आज मी जो काही आहे तो माझ्या आई-वडिलांमुळे आहे. माझी आई माझ्या सरावासाठी २ वाजता उठायची. नंतर माझ्यासाठी जेवण बनवायची. ती फक्त दिवसांतून तीन तासच झोपते. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी नोकरी सोडली आणि आता माझा मोठा भाऊ वडिलांचं काम पाहतो. मोठ्या कष्टाने घर चालतंय. पण जे कठोर परिश्रम करणाऱ्यांना देव नेहमीच यशस्वी करतो”, असे सूर्यवंशीने इंस्टाग्रामवरील अधिकृत आयपीएल अकाउंटवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

“मी माझ्या कुटुंबियांमुळेच यशस्वी होतोय. खूप दिवसांपासून मी तयारी करतोय. आता रिझल्ट मिळतोय तर यापुढेही आणखी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. संघासाठी चांगलं योगदान द्यायचं आहे”, असंही वैभव सूर्यवंशी म्हणाला.

“मी ट्रायल्समध्ये गेलो होतो तिथे चांगली बॅटिंग केली होती. राहुल द्रविड यांच्या हाताखाली काम करणं, प्रशिक्षण घेणं हे आमच्यासारख्या सामान्य खेळाडूचं मोठं स्वप्न असतं. मला वरिष्ठांकडून, सपोर्ट स्टाफकडून नेहमी प्रोत्साहन मिळतं. ते नेहमी सकारात्मक बोलतात. मैदानात गेलो तर मी संघाला जिंकवू शकतो, असा आत्मविश्वास ते देतात. आयपीएलची मॅच खेळतोय त्यामुळे थोडंफार दडपण असतं, पण संघाकडून कोणतंही दडपण नसतं”, असंही तो म्हणाला.

मी फक्त बॉल पाहिला

“अंडर १९ डोमेस्टिक मॅचममध्येही मी पहिल्या बॉलमध्ये षटकार लगावले आहेत, त्यामुळे मला त्याचं दडपण नव्हतं. मी क्लिअर होतो की माझ्या रडारवर बॉल आला तर मी मारणार हे मला माहीत होतं. मी फक्त बॉल पाहिला, मी माझा गेम आहे तो खेळण्याचा प्रयत्न केला”, असं म्हणत त्याने त्याच्या यशाचं श्रेय पालकांना आणि वरिष्ठांना दिलं.

वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने १.१ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. ज्यावेळी त्याची निवड झाली, त्यावेळी त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा फारसा अनुभव नव्हता. तो केवळ अंडर १९ क्रिकेट खेळून चर्चेत आला होता. मग राजस्थानने असं काय पाहिलं? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता वैभवने आपल्याला १.१ कोटींची बोली लावून संघात का घेतलं आहे, याचं उत्तर दिलं आहे.

वैभव सूर्यवंशीने आयपीएलमधील त्याच्या तिसऱ्याच डावात शतक पूर्ण करत वर्ल्ड रेकॉर्ड तोडला आहे. वैभव सूर्यवंशी हा अवघ्या १४ वर्षे ३२ दिवसांचा आहे. वैभवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकापेक्षा एक कमालीच्या गोलंदाजांची शाळा घेत त्यांच्याविरूद्ध वादळी फटकेबाजी केली. वैभवने इशांत शर्मासारख्या भेदक गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या षटकात चौकार-षटकारांची आतिषबाजी करत २६ धावा केल्या.

यासह वैभवने १७ चेंडूत आपले विक्रमी अर्धशतक पूर्ण केले. जे यंदाच्या आयपीएलमधील जलद अर्धशतक आहे. वैभवनंतर या यादीत सर्व फलंदाज हे १८ वर्षाचे आहेत, ज्यांनी शतकी खेळी केली आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा, देवदत्त पडिक्कल आणि मनिष पांडे यांचा समावेश आहे.