महाराष्ट्र व बडोदा यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट सामना मंगळवारी अपेक्षेप्रमाणे अनिर्णीत राहिला. मात्र या कंटाळवाण्या दिवशी बडोद्याच्या सौरभ वाकसकर व अभिमन्यु चौहान यांनी नाबाद शतके करीत वर्चस्व गाजविले. महाराष्ट्राने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई केली.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने बडोद्याच्या ३६२ धावांना उत्तर देताना ७ बाद ३७६ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. श्रीकांत मुंढे (५ चौकारांसह नाबाद ४६) याने शेवटच्या फळीतील अक्षय दरेकर (१८) व निकित धुमाळ (नाबाद २७) यांच्या साथीत आणखी ७३ धावांची भर घातली. महाराष्ट्राने ८ बाद ४४९ धावांवर पहिला डाव घोषित केला. महाराष्ट्रास पहिल्या डावात ८७ धावांची आघाडी मिळाली.
बडोद्याचा दुसरा डाव झटपट गुंडाळून निर्णायक विजय मिळविणे हे महाराष्ट्राच्या आवाक्याच्या बाहेर होते. त्यामुळेच औपचारिक राहिलेल्या उर्वरित खेळात बडोद्याच्या वाकसकर व चौहान यांनी मनमुराद फलंदाजीचा आनंद मिळविला. त्यांनी वैयक्तिक शतके टोलवितानाच अखंडित द्विशतकी भागीदारीही केली. त्यांनी ६३ षटकांमध्ये नाबाद २०७ धावा जमविल्या. वाकसकर याने नाबाद १०० धावा केल्या. त्यामध्ये त्याने १४ चौकार मारले. चौहान याने आक्रमक खेळ करीत नाबाद १०९ धावा केल्या. त्यामध्ये त्याने ९ चौकार व २ षटकार अशी आतषबाजी केली. वाकसकरचे शतक झाल्यानंतर सामना अनिर्णीत म्हणून खेळ थांबविण्यात आला.
संक्षिप्त धावफलक
बडोदा ३६२ व १ बाद २३१ (सौरभ वाकसकर नाबाद १००, अभिमन्यु चौहान नाबाद १०९)महाराष्ट्र ८ बाद ४४९ घोषित (हर्षद खडीवाले १६८, रोहित मोटवानी ९१, श्रीकांत मुंढे नाबाद ४६, भार्गव भट्ट ३/१४८, गगनदीपसिंग २/११०)    

Story img Loader