बलाढय़ रिअल माद्रिद संघाची सलग २२ विजयांची मालिका व्हॅलेन्सिया क्लबने येथे खंडित केली. स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेतील लढतीत त्यांनी हा सामना २-१ असा जिंकला. क्रिस्तियानो रोनाल्डो याने पेनल्टी किकद्वारे केलेल्या गोलच्या आधारे माद्रिद संघाने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात अन्तानिओ बाराग्न व निकोलस ओटामेन्डी यांनी प्रत्येकी एक गोल करीत व्हॅलेन्सियास सनसनाटी विजय मिळवून दिला. बार्सिलोना संघास रिअल सोसीदाद संघाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ घेता आला नाही. त्यांच्या जोर्डी अल्बा याने केलेल्या स्वयंगोलमुळेच त्यांना हा सामना ०-१ असा गमवावा लागला. माद्रिद व बार्सिलोना या बलाढय़ संघांना एकाच दिवशी घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी ३० एप्रिल २०११ या दिवशी या संघांना पराभव पत्करावा लागला होता.
मँचेस्टर युनायटेडची आगेकूच
एफए चषक स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडने येवव्हिल टाऊन संघावर २-० असा विजय मिळवला. आंदेर हेरेराने ६४व्या मिनिटाला युनायटेडचे खाते उघडले. बदली खेळाडू म्हणून आलेल्या अँजेल डि मारियाने सुरेख गोल करत युनायटेडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अन्य लढतीत चेल्सीने व्ॉटफोर्डचा ३-० असा धुव्वा उडवला. व्हिलिअन, लोइक रेमी आणि कुर्ट झोऊमा यांनी प्रत्येकी एक गोल केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा