Champions Trophy 2025 : २०१४ मध्ये ‘जीवा’ नावाचा तामीळ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात वरुण चक्रवर्तीने छोटीशी भूमिका साकारली होती. विष्णू विनोद प्रमुख भूमिकेत होता. पोरसवदा वयात ती भूमिका करणाऱ्या वरुणला ही आपलीच गोष्ट आहे असं कधी वाटलंही नसेल. त्या चित्रपटाची कथा एका होतकरू प्रतिभाशाली खेळाडूभोवती फिरते. पैसा नाही, संसाधनं नाहीत पण खेळण्याची भूक असलेला हा मुलगा परिस्थितीशी संघर्ष करत क्रिकेटची आवड जोपासतो. या मुलाची स्थानिक क्लबमधले प्रस्थापित व्यवस्थेबाहेरचा म्हणून हेटाळणी करतात. पण तो जिद्द हरत नाही, तो लढत राहतो आणि खेळाच्या बळावर जिंकतो. तो यशाची एकेक शिखरं पादाक्रांत करतो पण बाहेरचा हा शिक्का कायम राहतो. सतत लढून, संघर्ष करण्याचा प्रवास सुरू असतो, क्रिकेट सोडूया असंही त्याच्या मनात येतं. तेव्हाच आयपीएल संघाच्या टॅलेंट स्काऊटचा त्याला फोन येतो. तो फोन त्याचं आयुष्य बदलून टाकणारा ठरतो. जीवा भारतासाठी पदार्पण करतो आणि चित्रपट संपतो.
चित्रपटात ‘जीवा’ जसा प्रस्थापितांच्या नजरेतून बाहेरचा असतो तसं वरुण चक्रवर्ती भारतीय क्रिकेटमध्येही उपरा ठरतो. अनेक वर्षांपूर्वी भारतीय फिरकीपटू फक्त गोलंदाजीच करायचे, दुसरं काही नाही. भारतात डोमेस्टिक क्रिकेटची मोठी परंपरारुपी व्यवस्था आहे. वरुण या व्यवस्थेतून तावून सुलाखून निघालेला नाही. त्याने कोणत्याही वयोगट स्पर्धांमध्ये भाग घेतलेला नाही. जेणेकरून त्याचा रणजी करंडक खेळण्याचा प्रवास सुकर व्हावा. हे काहीही नसल्यामुळे भारतीय संघासाठी खेळण्याची शक्यताच नाही. त्याची कारकीर्द टेनिस बॉल क्रिकेटने सुरू झाली. मग तो तामिळनाडू प्रीमिअर लीग खेळू लागला. तिथे त्याचं कौशल्य पाहून त्याला आयपीएल संघात एंट्री मिळाली. आयपीएलमध्ये भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकणारा वरुण आता भारतीय संघाचा भाग आहे. चार वर्षांपूर्वी दुबईच्याच मैदानावर त्याची यथेच्छ धुलाई झाली होती. पण त्या धुलाईतून तो शिकला. चार वर्षानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा तो ‘वरुणास्त्र’ झाला आहे. संघात रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव असे तीन फिरकीपटू असतानाही वरुणला संघात स्थान देण्यात आलं. हा निर्णय किती योग्य होता याचा प्रत्यय वरुणचे आकडे देतात. ‘मिस्ट्री स्पिनर’ अर्थात रहस्यमयी गोलंदाजी करणारा वरुण टीम इंडियाचा ‘किमयागार’ झाला आहे. हर्षित राणाच्या जागी संघात आलेल्या वरुणने फिरकीला पोषक खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत सगळी अस्त्रं परजली आणि प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं.
२०२१ मध्ये आयपीएलमधल्या दमदार प्रदर्शनामुळे वरुणचं नाव घरोघरी पोहोचलं होतं. म्हणूनच त्याची दुबईत झालेल्या टी२० वर्ल्डकपसाठी निवड झाली. पण इतक्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याची त्याची पहिलीच वेळ होती. आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने त्याची सगळ्या मोठ्या खेळाडूंची भेट झाली होती, बोलणंही झालं होतं पण तरी तो बावरून गेला. ड्रेसिंगरुम शेअर करण्याचा पहिलाच अनुभव होता. भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी वरुणच्या त्यावेळच्या स्थितीविषयी सांगितलं. त्याने टी२० पदार्पण केलं तेव्हा तो दडपणाखाली होता. ज्यांना पाहत मोठा झाला त्यांच्याबरोबर खेळण्याचा अनुभव भांबावून टाकणारा होता. विराट कोहली तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार होता. गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षण कसं हवं हेही तो विराटला सांगू शकला नाही. त्याच्या गोलंदाजीसाठी जे क्षेत्ररक्षण कर्णधाराने सजवलं त्यानुसार त्याने गोलंदाजी केली. अरुण आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यामुळे त्यांचा वरुणशी ऋणानुबंध जुना असा.
आता तुम्ही त्याला पाहिलंत तर वेगळाच वरुण भासेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना ९० टक्के मानसिक असतं, वरुणला हे लवकर समजलं. चार वर्षांपूर्वीच्या अनुभवानंतर तो डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळू लागला. अथक मेहनत घेऊन गोलंदाजी केली. वेगवेगळी नवी अस्त्रं शिकून घेतली. आयपीएलमध्ये खूप साऱ्या विकेट्स पटकावल्या. हा आत्मविश्वास त्याच्या खेळात दिसतो. आता तो गोलंदाजीला येतो तेव्हा त्याला हवं तसं क्षेत्ररक्षण लावतो.
काही दिवसांपूर्वीच वरुणने फ्राईज विथ पोटॅटो युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये बोलताना तो म्हणाला, “सुरुवातीला मला एकदम हरवल्यासारखं वाटायचं. २६ वर्षांचा होतो, व्यायामशाळेत वगैरे गेलो नव्हतो. मी ९ ते ५ स्वरुपाची नोकरी करायचो. तिकडून मी एकदम भारतीय संघात गेलो, माझं आयुष्यच बदललं. सलग तीन वर्ष मी फिटनेस टेस्टमध्ये नापास व्हायचो. उद्या यो यो टेस्ट आहे असं कुणी सांगितलं तर त्या रात्री मला झोपच लागायची नाही. मला पॅनिक अटॅक यायचा. ज्यांना या टेस्टची प्रक्रिया माहिती नसते त्यांना जास्तच दडपण येतं. आताही मला या चाचणीचं दडपण येतं पण आता ते मी हाताळू शकतो.”
ऑस्ट्रेलियासाठी १९५०-५१ मध्ये पाच कसोटी खेळलेल्या जॅक इव्हर्सनची कहाणी वरुणच्या प्रवासाशी साधर्म्य सांगणारी आहे. दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेले जॅक ते संपल्यानंतर पापुआ न्यू गिनीत गेले. तिथे क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. १९४८ साली मेलबर्न क्रिकेट क्लबसाठी खेळलेले जॅक ऑस्ट्रेलियासाठी खेळले. वरुणची भरारीही अशीच काहीशी. २०१६ मध्ये शिक्षणाने वास्तूरचनाकार असलेला वरुण २०१८ मध्ये आयपीएलमधला मिस्ट्री स्पिनर होतो. पुढच्याच वर्षी आयपीएल पदार्पण करतो.
क्रिकेट खेळणं थांबवल्यानंतर वरुणला सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांची निर्मिती करायची आहे. त्याच्या रोलरकोस्टर कारकीर्दीतली वळणं त्याला चित्रपट निर्मितीच्या वेळी कामी येतील.
२०१७ मध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरुवात करण्यापूर्वी वरुण स्थानिक स्पर्धांमध्ये खेळत असे. त्या आठवणीत वरुण रमतो. तो सांगतो, “एखादा बॅटिंग करत असेल आणि म्हणाला षटकार मारलास तर ५०० रुपये देईन. चौकार मारलास तर ३०० रुपये देईन. मला ते पैसे महत्त्वाचे होते. तसं झालं नाही तर मी लीगमध्ये खेळणाऱ्या बॅट्समनना गोलंदाजी करत असे.” भारतीय संघाचे माजी सलामीवीर के.श्रीकांत यांचा मुलगा अनिरुद्ध याच्यासाठी वरुण नेट बॉलरचं काम करत असे. एका सेशनचे त्याला ५०० रुपये मिळत असत.
लोव्हर डिव्हिजनमध्ये खेळण्याच्या संधी मिळू लागल्या. त्याचवेळी त्याने अकादमींची दारं ठोठावली. “तिथे मी एकदमच वेगळा भासत असे कारण तिथे २० वर्षांखालची मुलं खेळत. मी सांगायचो, मला काही शिकवू नका. मला तीन तास गोलंदाजी करू द्या. वयाच्या या टप्प्यावर तुम्ही कोणाला क्रिकेट कसं खेळायचं शिकवू शकत नाही. लीग खेळणाऱ्या फलंदाजांसाठी मी रोज ३०० चेंडू टाकायचो.”
सेकंड डिव्हिजनमध्ये खेळण्याची संधी मिळाली तेव्हा संघाने वरुणला फिरकीपटू म्हणून घेण्यास नकार दिला. “त्यांनी मला निवडलं नाही मग मी पाचव्या डिव्हिजनकडून खेळू लागलो. तिथेही मी वेगवान गोलंदाज म्हणून सुरुवात केली. ७ सामन्यात माझ्या नावावर ८ विकेट्स होत्या. पुढच्या सामन्यात सामन्यादरम्यानच मी फिरकी टाकायला सुरुवात केली. पुढच्या ४ सामन्यात मी २८ विकेट्स घेतल्या. अचानकच सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये माझं नाव झळकलं.”
“फिरकीपटू होणं हे माझं उद्दिष्ट नव्हतं. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत असतानाही मी वेगवान गोलंदाजच होतो. मी तेव्हा अनिल कुंबळे, रशीद खान, अॅडम झंपाचे व्हीडिओ पाहायचो. तेव्हा मी १८ विविध पद्धतीने चेंडू वळवायचो. आता मी ही संख्या ४ वर आणली आहे. या कामगिरीच्या जोरावर २०१७ मध्ये तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये त्याला संधी मिळाली. कराईकुडी कलाईज संघाने त्याला सलामीवीर फलंदाज म्हणून घेतलं होतं. मी एक सामना खेळलो, पण कोणी मला बॅटिंगही दिली नाही असं मी श्रीकांत सरांना सांगायचो. इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू झाल्यावर मला संधीच मिळाली नाही. मला संधी मिळेल अशी आशा आहे.”
“मिस्ट्री स्पिनर म्हणून लोकप्रिय झाल्यामुळे पुढच्या वर्षी मदुराई पँथर्स संघाने मला संघात घेतलं. हा टप्पा महत्वाचा होता. इथूनच त्याची निवड आयपीएल संघ पंजाब किंग्ज संघाने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. पण तिथेही त्याला एकाच सामन्यात खेळता आलं. मी प्रचंड उत्साहात होतो. ते सगळं मी हाताळू शकलो नाही. माझ्या खांद्याला दुखापत झाली होती. पण तरी मी गोलंदाजी करत राहिलो. त्यामुळेच माझ्या स्नायूंना दुखापत झाली. काय करावं हेच मला कळत नव्हतं.”
या वाटचालीदरम्यान वरुणला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. २०२२ मध्ये ११ सामन्यात वरुणला ६ विकेट्सच घेता आल्या. टोमण्यांची त्याला सवय झाली. “एखाद्या सामन्यात माझ्या गोलंदाजीवर खूप धावा कुटल्या गेल्या, विकेट्स मिळाल्या नाही तर मिस्ट्री नव्हे मइेस्त्री म्हणत. तामीळ भाषेत बांधकाम कामगार. मी वास्तूरचनाकार आहे म्हणून मला असं ट्रोल करत असत. आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मला झेपणारं नाही असं बोलत. फँटसी लीग खेळणाऱ्या चाहत्यांचे असे मेसेज येत.”
२०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळण्याचा अनुभव वरुणसाठी निर्णायक ठरला. तिथे भारताचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक होता. दोघेही तामिळनाडूचे, त्यामुळे एकच भाषा बोलतात. कोलकाता संघाकडून खेळताना वरुणला सुनील नरिनच्या साथीने खेळता आलं, सराव करता आला. नरिनही मिस्ट्री स्पिनर. दोघांची शैली वेगळी आहे. वरुण लेगस्पिनर आहे तर नरिन ऑफस्पिनर आहे. नरिनच्या मार्गदर्शनात वरुण असंख्य गोष्टी शिकला.
गेल्या दोन वर्षात स्वत:च्या गोलंदाजीविषयी वरुणला अनेक गोष्टी समजल्या. कुठलं अस्त्र कधी परजायचं हे त्याला कळू लागलं आहे. फलंदाजांना त्याचे चेंडू कळत नाहीत. चेंडू वळण्यापेक्षा टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन यष्ट्यांचा वेध घेणारे चेंडू फलंदाजांना अडचणीत टाकतात.
गेल्या वर्षभरात क्रिकेट सोडून वरुणला अन्य कशाचा विचार करायलाही वेळ मिळालेला नाही. पण क्रिकेट सोडून वेगळा विचार करायचा असतो तेव्हा तो वास्तूरचनेवर लक्ष केंद्रित करतो. मला ते उपयोगी पडतं असं वरुण सांगतो. एखादा रिकामा भूखंड दिसतो तेव्हा तिथे इमारत कशी दिसेल याचा मी विचार करतो. त्याच धर्तीवर एखादा फलंदाज खेळायला येतो तेव्हा तो कसा उभा राहतो, कसा खेळतो याचा विचार करून मी तयारी करतो.