इंग्लंडचा कर्णधार आणि आधारस्तंभ वेन रुनीने निवृत्तीची वेळ पक्की केली आहे. २०१८ मध्ये रशियात होणाऱ्या विश्वचषकानंतर रुनी इंग्लंडकरता खेळणार नाही.
‘इंग्लंडचे प्रतिनिधित्त्व करताना सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी रशियात होणारा विश्वचषक माझ्यासाठी शेवटची संधी असेल. पुढील दोन वर्ष खेळाचा पुरेपूर आनंद घेत दमदार प्रदर्शन करण्यासाठी सज्ज आहे’, असे रुनीने सांगितले. दरम्यान विश्वचषकासाठीच्या पात्रता फेरींच्या लढतींसाठी रुनीकडेच इंग्लंडचे कर्णधारपद असेल असे नवनियुक्त व्यवस्थापक सॅम अॅलारडय़ुस यांनी सांगितले.
इंग्लंडसाठी ११६ सामने खेळत सर्वाधिक सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्त्व करण्याचा विक्रम रुनीच्या नावावर आहे. २०१४ पासून इंग्लंडचे कर्णधारपद भूषवणारा रुनी ५३ गोलसह सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या स्पर्धामध्ये रुनीच्या समावेश असलेल्या इंग्लंड संघाला उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही. ही कामगिरी पुढील विश्वचषकात सुधारण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्नशील आहे.
दोन वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात आइसलँडसारख्या तुलनेने अनुनभवी संघानेदेखील इंग्लंडवर मात केली होती. त्यावेळी रुनीच कर्णधार होता. त्यावेळी रुनी आणि इंग्लंड संघावर जोरदार टीका झाली होती.
आतापर्यंत इंग्लंडचे प्रतिनिधित्त्व करताना मी पुरेपूर आनंद लुटला आहे. इंग्लंडसाठीची कारकीर्द दिमाखदार आहे. मात्र योग्यवेळी निवृत्तीचा निर्णय घेणे आवश्यक आहे. माझे फार वय झालेले नाही. रशियातील विश्वचषकाद्वारे खेळाला अलविदा करणे योग्य ठरेल. मी माझा निर्णय पक्का केला आहे.
– वेन रुनी, इंग्लंडचा कर्णधार