महाराष्ट्रातील जनता दुष्काळाच्या झळा सोसत असताना, त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्याकरिता आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर सामना आयोजित करण्यासाठी वेंगसरकर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) साकडे घातले आहे.
वेंगसरकर यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पत्र लिहून अतिरिक्त सामना खेळविण्याची विनंती केली आहे. या पत्राची प्रत त्यांनी आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सहसचिव संजय जगदाळे आणि अनुराग ठाकूर यांनाही पाठवली आहे. ‘‘महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतील लोक दुष्काळाने होरपळत आहेत. त्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे. यापूर्वी प्रत्येक वेळी अशा कठीण परिस्थितीत बीसीसीआयने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
२६ मे रोजी कोलकातात अंतिम सामना झाल्यानंतर बीसीसीआयने २८ मे रोजी वानखेडे स्टेडियम किंवा डी. वाय. पाटील स्टेडियम येथे अतिरिक्त सामना खेळवावा. या सामन्यातून मिळणारा निधी हा दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येईल,’’ असे वेंगसरकर यांनी पत्रात म्हटले आहे. वेंगसरकर यांच्या या भूमिकेनंतर बीसीसीआय कोणते पाऊल उचलतेय, याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा