Venkatesh Iyer Injured in Ranji Trophy: रणजी ट्रॉफी सामन्यांच्या दुसऱ्या फेरीत कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. कोलकाता संघाने २३.७५ कोटी खर्चून वेंकटेश अय्यरला संघात सामील केलं. पण रणजी ट्रॉफी सामन्यात मात्र वेंकटेश अय्यरच्या पायाला दुखापत झाली आहे. मध्य प्रदेशकडून खेळताना वेंकटेशला ही दुखापत झाली. केकेआरच्या स्टार खेळाडूला मैदानावर झालेल्या दुखापतीमुळे चालताही येत नव्हतं. मैदानावर प्रदीर्घ उपचारानंतर वेंकटेशला मैदानाबाहेर जावं लागलं.
IPL 2025 च्या आधी KKR टीमसाठी ही एक वाईट बातमी आहे. वेंकटेश अय्यरला रणजी ट्रॉफीमध्ये केरळविरुद्ध खेळताना गंभीर दुखापत झाली आहे. मध्य प्रदेशकडून सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वेंकटेशचा फलंदाजी करताना पाय मुरगळला. त्यानंतर तो वेदनेने कळवळताना दिसला. तितक्यात फिजिओ लगेच मैदानावर आले आणि त्याच्या दुखापतीची तपासणी केली.
मात्र, प्रदीर्घ उपचारानंतरही वेंकटेश पुन्हा फलंदाजी करायला उभा राहू शकला नाही. वेंकटेशला नीट चालता येत नसल्याने तो आधार घेऊन मैदानाबाहेर आला. आता वेंकटेशची दुखापत कितपत गंभीर आहे आणि तो पुढे सामना खेळणार की नाही, यावर सर्वांच्या नजरा आहेत. कारण कोलकाता नाईट रायडर्सने लिलावात या अष्टपैलू खेळाडूसाठी तिजोरी रिती केली होती. पण दुखापत असतानाही तो काही वेळाने संघासाठी फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता आणि त्याने ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण त्याची दुखापत कितपत बरी आहे, याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने वेंकटेश अय्यरसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. केकेआरने २३.७५ कोटी रुपये खर्च करून वेंकटेशचा पुन्हा आपल्या संघात समावेश केला आहे. गेल्या मोसमात वेंकटेशची कोलकाता संघासाठी कामगिरी अप्रतिम होती. अंतिम सामन्यातही त्याने २६ चेंडूत ५२ धावांची झटपट खेळी करत केकेआरला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आयपीएल २०२५ चा सीझन येत्या २२ मार्च २०२५ पासून सुरू होणार आहे. या सीझनपूर्वी आयपीएल मेगा लिलाव झाल्याने सर्व संघांचा चेहरामोहरा बदलला आहे. प्रत्येक संघात नवे खेळाडू सहभागी झाले आहेत. तर केकेआर संघाने रिलीज केलेल्या वेंकटेश अय्यरला पुन्हा लिलावात मोठ्या किमतीला सामील करून घेतलं. केकेआरच्या संघाचे कर्णधारपदही वेंकटेश अय्यरला दिली जाईल अशी चर्चा आहे.