Venkatesh Prasad on Hardik Pandya and Rahul Dravid: विश्वचषक पात्रता फेरीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या वेस्ट इंडिज संघाने भारतीय क्रिकेट संघाचा पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-२ असा पराभव करून शानदार मालिका विजय नोंदवला. या धक्कादायक पराभवानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी कर्णधार हार्दिक पांड्या आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर मालिकेतील संघाची खराब कामगिरी आणि खराब रणनीतीबद्दल टीका केली.
मालिका पराभवानंतर अगदी काहीचं मिनिटांनी, व्यंकटेश प्रसाद यांनी ट्वीटरवर आपली भावना व्यक्त केली. त्यांनी आधीच केलेले ट्वीट रीट्वीट केले. त्यात ते म्हणतात, “मर्यादित षटकांचा अत्यंत सामान्य संघ”. याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारत ०-२ने पिछाडीवर होता त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती आणि त्यांचे हे ट्वीट खूप गाजले देखील होते.
व्यंकटेश प्रसाद यांनी दुसरे ट्वीट केले. त्यात ते म्हणतात की, “भारत हा अलीकडच्या काळात मर्यादित षटकांच्या खेळात अत्यंत सामान्य संघ बनला आहे. काही महिन्यांपूर्वी टी२० विश्वचषकासाठी पात्र न ठरू शकलेल्या आणि मर्यादित षटकांच्या विश्वचषकासाठी अपात्र ठरलेल्या वेस्ट इंडिज संघाकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला, ही खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. एकदिवसीय मालिकेतही टीम इंडिया बांगलादेशकडून हरली, आतातरी ते आत्मपरीक्षण करतील अशी आशा आहे. मात्र, आत्मपरीक्षण करण्याऐवजी ते सर्व ठिकाणी फालतू कारणे देत सुटले आहेत.”
भारताच्या या माजी गोलंदाजी प्रशिक्षकाने टीम इंडियावर घणाघात केला. ते म्हणतात की, “पराभवापेक्षा संघ व्यवस्थापनाने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली आहे त्याचे मला सर्वात जास्त दुख: झाले आहे. आशिया चषक आणि नंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज होत असलेल्या सध्याच्या भारतीय संघाची जिंकण्याची ‘आग आणि भूक’ गायब झाली आहे. उगाचच पराभवानंतर फालतू कारणे देत सुटले आहेत.” माजी वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला, “केवळ ५० षटकेच नाही, तर वेस्ट इंडिज गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकासाठीही पात्र ठरू शकला नाही. प्रक्रियेच्या नावाखाली भारताने खराब कामगिरी केली आणि सर्व चुका या दडपल्या, हे दृश्य पाहणे अत्यंत वाईट आहे. संघातील ती जिंकण्याची भूक, ती आग गायब झाली आहे आणि आपण एका भ्रमात आहोत.”
जेव्हा प्रसादला कर्णधार हार्दिक आणि मुख्य प्रशिक्षक द्रविडबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, “जसे विजयाचे श्रेय घेतात तसेच ते पराजयासाठीही जबाबदार आहेत,” असे म्हणत त्यांच्यावर निशाना साधला. “कर्णधार आणि प्रशिक्षक पराभवासाठी जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केलीच पाहिजे. प्रक्रिया आणि प्रयोग यांसारख्या शब्दांचा आता गैरवापर होत आहे. धोनीसाठी हा शब्द अंमलात आणणे महत्वाचे होते. पण मित्रांनो आता फक्त हा केवळ शब्द म्हणूनच वापरला जातो बाकी अंमलात आणण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. निवडीत सातत्य नाही, ज्याच्या मनात जसे येते तशा गोष्टी घडत आहेत.”
व्यंकटेश यांनी पुढे लिहिले की, “भारताला आपले कौशल्य सुधारण्याची गरज आहे. त्यांच्यात विजयाची भूकेचा अभाव दिसून येतो आणि अनेकदा कर्णधार अनाकलनीय निर्णय घेत असल्याचे दिसून येते. गोलंदाज फलंदाजी करू शकत नाही, फलंदाज गोलंदाजी करू शकत नाही. टीम इंडियाकडे अष्टपैलू खेळाडूंचा अभाव जाणवतो. इथे एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीला विचार न करता हो म्हणणारे लोक शोधू नका. कोणीतरी तुमचा आवडता खेळाडू आहे म्हणून त्याच्याबाजूने आंधळेपणाने निर्णय घेऊ नका. संघाचे हित शेवटी अधिक महत्वाचे आहे.”
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी२० मध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवने विंडीजच्या आक्रमणाविरुद्ध एकहाती झुंज दिली त्याने ४५ चेंडूत ६१ धावा करत भारताला नऊ बाद १६५ पर्यंत मजल मारून दिली. यानंतर ब्रँडन किंग आणि निकोलस पूरन यांनी १०७ धावांची शानदार भागीदारी करत लक्ष्य अगदी सहजरीत्या पार केले. वेस्ट इंडिजने हे लक्ष्य दोन षटके बाकी असताना पूर्ण केले आणि आठ विकेट्सने सामना जिंकला.