हंगामातली खेळाडूंची कारकीर्द, तंदुरुस्ती या गोष्टींचा विचार करून ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी मानांकने दिली जातात. मात्र ही मानांकने किती फसवी आहेत, याचा जणू प्रत्ययच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला खेळाडूंनी दिला. द्वितीय मानांकित सिमोना हालेप, सहाव्या मानांकित अँजेलिक्यू कर्बर यांच्यासह दोन वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या व्हीनस विल्यम्सला तिसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. आठव्या मानांकित अ‍ॅना इव्हानोव्हिकचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले होते. या अनपेक्षित कामगिरीमुळे मानांकित खेळाडूंनी ‘चला जाऊ माघारी’चा मार्गच पत्करल्याचे स्पष्ट  झाले आहे. जेतेपदाचे दावेदार असणाऱ्या मारिया शारापोव्हा आणि रॉजर फेडरर यांनी विजयी आगेकूच केली.
इटलीच्या सारा इराणीने व्हीनस विल्यम्सवर ०-६, ६-०, ७-६ (७-५) असा अनपेक्षित आणि धक्कादायक मिळवला.
क्रोएशियाच्या ३२ वर्षीय मिरजाना ल्युकिक-बरोनीने द्वितीय मानांकित सिमोना हालेपवर ७-६ (८-६), ६-२ अशी मात केली. स्वित्र्झलडच्या युवा बेलिंडा बेनकिकने सहाव्या मानांकित अँजेलिक्यू कर्बरला ६-१, ७-५ असे नमवले. तसेच मारिया शारापोव्हाने जर्मनीच्या सबिन लिसीकीवर ६-२, ६-४ मात करत आगेकूच केली.
पुरुषांमध्ये दोन वर्षांपासून ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रॉजर फेडररने अमेरिकेच्या सॅम ग्रॉथला ६-४, ६-४, ६-४ असे नमवले.
पेस-स्टेपानेक दुसऱ्या फेरीत
लिएण्डर पेस आणि त्याचा चेक प्रजासत्ताकचा साथीदार राडेक स्टेपानेक जोडीने अमेरिकन खुल्या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सहाव्या मानांकित पेस-स्टेपानेक जोडीने तैपेईच्या येन ह्य़स्युन ल्यू आणि चेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्ले जोडीवर ७-६ (३), ६-३ असा विजय मिळवला.
 

Story img Loader