प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात, इराणचा बचावपटू फैजल अत्राचलीवर विक्रमी बोली लावण्यात आली आहे. प्रो-कबड्डीच्या इतिहासात १ कोटी रुपयांची बोली लागणारा फैजल पहिला खेळाडू ठरला आहे. सहाव्या हंगामासाठी यू मुम्बाने फैजलला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. मुंबईत पार पडत असलेल्या लिलावात, फैजलला आपल्या संघात दाखल करुन घेण्यासाठी मुंबई आणि जयपूरच्या संघांमध्ये चढाओढ लागली होती, अखेर मुंबईने यात बाजी मारत फैजलला संघात दाखल करुन घेतलं.
या लिलावानंतर फैजलने थेट इराणवरुन पत्रकारांशी संवाद साधला. “माझ्यावर लागलेल्या विक्रमी बोलीचा मला आनंद झालेला आहे. यू मुम्बा हे माझं दुसरं घर आहे, मी एक हंगाम त्यांच्याकडून खेळलो असल्याने मला माझ्या घरी परतत असल्यासारखं वाटतंय. यंदाच्या हंगामात माझ्याकडून मुम्बाला विजेतेपद मिळवून देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन.” फैजलने पत्रकारांसोबत आपल्या भावना व्यक्त केल्या. फैजलव्यतिरीक्त यू मुम्बाने अबुफजल मग्शदुलू आणि हादी ताजिक या इराणी खेळाडूंनाही संघात जागा दिली आहे.
अवश्य वाचा – फैजल अत्राचली प्रो-कबड्डीतला पहिला करोडपती, यू मुम्बाकडून १ कोटी रुपयांची बोली