ला लिगा स्पर्धेचे विजेत्या बार्सिलोना संघाने अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्धची लढत ०-० बरोबरीत सोडवत सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. गेल्या पाच वर्षांतले बार्सिलोनाचे हे चौथे सुपर चषक जेतेपद आहे. लढत बरोबरीत सुटल्याने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर केलेल्या गोलसंख्येच्या निकषावर बार्सिलोनाने विजय साकारला. अ‍ॅटलेटिको माद्रिदतर्फे झालेले गोलचे दोन शानदार प्रयत्न रोखत बार्सिलोनाचा गोलरक्षक व्हिक्टर वाल्देसने बरोबरीत महत्त्वाची भूमिका निभावली. या दोन संघात झालेली साखळी गटाची लढतही ०-० बरोबरीत संपली होती. बार्सिलोनाच्या ताफ्यातील नवा तारा नेयमारचा खेळ पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. मात्र नेयमार बार्सिलोनासाठी गोल करू शकला नाही. स्पर्धेची कुठलीही फेरी न जिंकता जेतेपद पटकावण्याची बार्सिलोनाची ही पहिलीच वेळ आहे. नवीन प्रशिक्षक गेराडरे मार्टिनो यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवेलले बार्सिलोनाचे हे पहिलेच जेतेपद ठरले.