ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळविलेल्या निर्विवाद विजयाचे श्रेय संघातील प्रत्येक खेळाडूने केलेल्या दिमाखदार कामगिरीला द्यावे लागेल, असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी म्हणाला.
कांगारूंवर ४-० असा विजय मिळविल्यानंतर धोनी याने सांगितले, ‘‘इंग्लंडकडून आमच्या घरच्या मैदानावर आम्हाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. या पाश्र्वभूमीवर ऑसीविरुद्धच्या विजयाने पुन्हा आमची शान वाढविली आहे. शेवटपर्यंत चांगली लढत दिली तर यश आपोआपच मिळत राहते हे या मालिकेत दिसून आले आहे. संघात अनेक बदल करण्यात आले असूनही आम्ही नवोदित खेळाडूंसह सर्वोत्तम कामगिरी करू शकलो याचेच मला अधिक समाधान वाटत आहे. संघातील प्रत्येकाने त्याचा क्षमतेइतके कौशल्य दाखविले व संघास आनंदाचा क्षण मिळवून दिला आहे.’’
खेळपट्टींबाबत धोनी म्हणाला, ‘‘प्रत्येक सामन्यातील खेळपट्टी फिरकीस अनुकूल होती याचाच अर्थ आम्हाला चौथ्या डावात ऑसीच्या फिरकी गोलंदाजीला तोंड द्यावे लागणार होते. ही खरे तर खूप अवघड कामगिरी होती. मात्र आमच्या फलंदाजांनी आत्मविश्वासाने खेळ केला व ही कामगिरी सोपी केली. कालपेक्षा आज येथील खेळपट्टी अधिक चांगली होती व आमच्या पहिल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारीने खेळ करीत विजयाचा पाया रचला.’’
गोलंदाजांनी निराशा केली -वॉटसन
कोटलाच्या खेळपट्टीवर १५० ते २०० धावाही करणे आव्हानात्मक होते, मात्र आमच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली, असे ऑस्ट्रेलियाचा प्रभारी कर्णधार शेन वॉटसन याने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘या कसोटीत शेवटपर्यंत चिवट झुंज पाहायला मिळाली. आम्ही विजय मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. तथापि चेतेश्वर पुजारा याने झुंजार खेळ करीत आमच्या आशा धुळीस मिळविल्या.
आमच्या संघात बरेचसे खेळाडू अननुभवी होते. त्यांच्यासाठी ही कसोटी मालिका बरेच काही शिकवणी देणारी ठरली आहे.
प्रत्येक आघाडीवर आम्हास भरपूर शिकावयास मिळाले आहे. घरच्या मैदानापेक्षा परदेशातील खेळपट्टी व वातावरणात खेळण्याची संधी मिळाली की खेळाडू आपोआप तयार होतात.         
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर मी गोलंदाजीच्या शैलीत काही बदल केले होते व हे बदलच मला येथे भरपूर यश मिळवून देणारे ठरले. येथील खेळपट्टी गोलंदाजांप्रमाणेच फलंदाजांसाठीही अतिशय फसवी होती. तथापि पुजारा याने संयमी खेळ करीत विजयाचा मार्ग सुकर केला.
-आर. अश्विन
खेळपट्टी फिरकी गोलंदाजीस अनुकूल होती आणि मी दिशा-टप्पा ओळखून गोलंदाजी केली. त्यामुळेच मला भरपूर विकेट्स मिळाल्या. मात्र फलंदाजीत मी अपेक्षेइतक्या धावा करू शकलो नाही याचेच मला दु:ख झाले.
-रवींद्र जडेजा

Story img Loader