Ranji Trophy 2024: अतिशय चुरशीच्या अशा सेमी फायनल लढतीत तुल्यबळ मध्य प्रदेश संघाला ६२ धावांनी नमवत विदर्भ संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स मैदानावर झालेल्या या मुकाबल्यात विदर्भला पाचव्या आणि अंतिम दिवशी पाच विकेट्सची तर मध्य प्रदेशला ९३ धावांची आवश्यकता होती. पण विदर्भच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत अवघ्या तासाभरात मध्य प्रदेशचा डाव गुंडाळला आणि दिमाखदार विजय साकारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१० तारखेपासून मुंबईतल्या वानखेडे मैदानावर होणार असलेल्या अंतिम लढतीत विदर्भसमोर बलाढ्य मुंबईचं आव्हान असणार आहे. मुंबईने सेमी फायनलच्या लढतीत तामिळनाडूवर डावाच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला होता. यानिमित्ताने रणजी करंडक महाराष्ट्रातच राहण्याचा योग जुळून आला आहे. मुंबईच्या नावावर तब्बल ४१ तर विदर्भच्या नावावर २ जेतेपदं आहेत.

विदर्भने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आव्हानात्मक खेळपट्टीवर विदर्भला १७० धावांचीच मजल मारता आली. विदर्भकडून करुण नायरने ६३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सलामीवीर अथर्व तायडेने ३९ धावा करत त्याला चांगली साथ दिली. मध्य प्रदेशकडून अवेश खानने ४ विकेट्स पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मध्य प्रदेशने हिमांशू मंत्रीच्या दमदार शतकाच्या बळावर २५२ धावा केल्या. हिमांशूने एकखांबी नांगर टाकून १३ चौकार आणि एका षटकारासह १२६ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. हिमांशूला बाकी फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. विदर्भतर्फे उमेश यादव आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मध्य प्रदेशला ८२ धावांची आघाडी मिळाली.

पहिल्या डावात भंबेरी उडालेल्या विदर्भने दुसऱ्या डावात मात्र ४०२ धावांचा डोंगर उभारला. सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या यश राठोडने १८ चौकार आणि २ षटकारांसह १४१ धावांची दमदार खेळी साकारली. कर्णधार अक्षय वाडकरने ७७ तर अमन मोखाडेने ५९ धावा करत त्याला चांगली साथ दिली. यश-अक्षय यांनी सहाव्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी केली. मध्य प्रदेशकडून अनुभव अगरवालने ५ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या रचत विदर्भने मध्य प्रदेशसमोर ३२१ धावांचं लक्ष्य ठेवलं.

मध्य प्रदेशने हिमांशू मंत्रीला झटपट गमावलं. पण यानंतर यश दुबे आणि हर्ष गवळी यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी करत मध्य प्रदेशच्या आशा पल्लवित केल्या. यश ठाकूरने हर्षला बाद करत ही जोडी फोडली. हर्षने ११ चौकारांसह ६७ धावांची खेळी केली. हर्षला बाद केल्यानंतर यशने एका बाजूने बराच काळ किल्ला लढवला पण विदर्भने दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट्स घेत मध्य प्रदेशच्या डावाला खिंडार पाडले. कर्णधार शुभम शर्मा, भारताचं प्रतिनिधित्व केलेला वेंकटेश अय्यर यांच्याकडून मध्य प्रदेशला अपेक्षा होत्या पण ते मोठी खेळी करू शकले नाहीत. चौथ्या दिवसअखेर मध्य प्रदेशने सहा विकेट्स गमावल्या होत्या. पाचव्या आणि अंतिम दिवशी विदर्भच्या गोलंदाजांनी जराही वेळ न दवडता उर्वरित विकेट्स पटकावत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha enters ranji trophy final after beating madhya pradesh by 62 runs to meet mumbai in final at wankhede bdg99
Show comments