आजपासून जामठा मदानावर शेष भारताविरुद्ध इराणी चषकासाठी लढत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इराणी चषक क्रिकेट स्पर्धा

नागपूर : सलग दोन वेळा रणजी करंडक विजेता विदर्भ संघ आता इराणी करंडकावरही दुहेरी विजेतेपदाची मोहोर उमटवण्यासाठी उत्सुक आहे. मंगळवारपासून विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर विदर्भाची लढत बलाढय़ शेष भारताविरुद्ध होणार आहे. यजमान विदर्भ संघ सलग यंदाही रणजी करंडकाप्रमाणेच इराणी करंडक विजेतेपदाची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक आहे.

रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रला पराभूत करून जेतेपद राखत सलग दुसऱ्याही वर्षी विदर्भवासीयांना सुखद धक्का दिला. आता त्याच मदानावर विदर्भ शेष भारतासोबत दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी इराणी करंडक स्पर्धेत विदर्भाने पहिल्या डावात ७ बाद ८०० धावांचा डोंगर रचला होता. अनुभवी फलंदाज वसीम जाफरने शानदार २८६ धावांची खेळी साकारत विदर्भाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. अपूर्व वानखेडेनेही नाबाद १५७, तर गणेश सतीशने शतक झळकावले होते. त्यामुळे विदर्भ शेष भारताविरुद्धही मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मदानात उतरणार आहे.

यंदाच्या हंगामात सर्वाधिक बळी टिपणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असलेला अष्टपलू फिरकीपटू आदित्य सरवटेपासून शेष भारताचा संघ सावध आहे, तर अक्षय वाखरेनेही यंदाच्या हंगामात आपल्या गोलंदाजीची धार दाखवली आहे. विदर्भाचा तळातील फलंदाज अक्षय कर्णेवारनेही संघाला आवश्यकता असताना चांगली फलंदाजी केली आहे. मात्र उपांत्य सामन्यात मोलाची कामगिरी करणारा उमेश यादव खासगी कारणामुळे इराणी करंडकात खेळणार नसल्याने त्याची अनुपस्थिती संघाला नक्कीच जाणवणार आहे.

दुसरीकडे शेष भारताचे नेतृत्व कसोटीपटू अजिंक्य रहाणेकडे असणार आहे. या संघात हनुमा विहारी, मयांक अगरवाल, श्रेयस अय्यर, यष्टीरक्षक इशान किशन यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या खेळाडूंचा भरणा असल्याने विदर्भापुढे त्याचे कडवे आव्हान असणार आहे.

विजयाची पुनरावृत्ती करण्यास आम्ही उत्सुक आहोत. इराणी स्पर्धेमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर माझी भारतीय संघासाठी निवड झाली होती. त्यामुळे हा सामना संघातील सर्व सदस्यांसाठी महत्त्वाचा आहे. लागोपाठ ११ सामने खेळणे सोपी बाब नाही. आंतरराष्ट्रीय संघही एवढे सलग सामने खेळत नाही. मात्र व्यग्र क्रिकेटचे कारण आम्ही देऊ शकत नाही. तुम्हाला सातत्यपूर्व क्रिकेटसाठी सज्ज राहावेच लागते. उमेशची  अनुपस्थिती नक्कीच जाणवेल. शेष भारताचा संघही तगडा आहे. त्यामुळे चुका टाळण्यावर आमचा अधिक भर असेल. विजयाबद्दल मी आशावादी आहे.

– फैज फजल, विदर्भाचा कर्णधार

विदर्भाने सलग दोन वेळा रणजी विजेतेपद पटकावले असल्याने त्यांना कमी लेखून चालणार नाही. विदर्भ हा मजबूत संघ आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा आदर करतो. देशांतर्गत क्रिकेटच्या कामगिरीची दखल घेत तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळत असते. त्यामुळे सामन्यात सर्वच खेळाडू चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतील.

अजिंक्य रहाणे, शेष भारतचा कर्णधार

संघ

* विदर्भ : फैज फजल (कर्णधार), वसीम जाफर, आर. संजय, गणेश सतीश, अक्षय वाडकर, अथर्व तायडे, मोहित काळे, सिद्धेश वाठ, रजनीश गुरबानी, आदित्य सरवटे, अक्षय कर्णेवार, अक्षय वाखरे, यश ठाकूर, सुनिकेत बिंगेवार, दर्शन नळकांडे.

* शेष भारत संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयांक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टिरक्षक), कृष्णप्पा गौतम, धर्मेद्रसिंग जडेजा, राहुल चाहर, अंकित राजपूत, तन्वीर उल हक, रोनित मोरे, संदीप वॉरियर, रिंकू सिंग, स्नेल पटेल.

* सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २