रवी जांगिडच्या नेत्रदीपक अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विदर्भाने अखेरच्या साखळी सामन्यात हरयाणावर एक डाव आणि ३१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह त्यांनी या सामन्यात सात गुण मिळवले, तर एकूण २९ गुणांसह उपांत्यपूर्व फेरीत दिमाखदार प्रवेश केला आहे. फॉलोऑन लादल्यावर दुसऱ्या डावात जांगिडने सात बळी मिळवण्याची किमया साधली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर विदर्भाला हरयाणाचा दुसरा डाव २३२ धावांवर संपुष्टात आणता आला.
हरयाणाने २ बाद ६६ धावसंख्येवरून चौथ्या दिवसाची सुरुवात केली. जांगिडने या वेळी हरयाणाच्या फलंदाजांना आपल्या डावखुऱ्या भेदक फिरकी माऱ्याच्या जोरावर चांगलेच नाचवले. पण रोहित शर्माने एका बाजूने विदर्भच्या गोलंदाजीचा चांगला सामना केला. यजुवेंद्र चलहने एकही धाव केली नसली तरी त्याने तब्बल ७७ चेंडूचा सामना करत विदर्भाचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला. रोहित आणि यजुवेंद्र विदर्भाला विजय मिळवू देणार नाहीत, असे वाटत होते. पण जांगिडने हार मानली नाही. त्याने रोहितचा त्रिफळा भेदत संघाला मोठे यश मिळवून दिले. रोहितने १० चौकारांच्या जोरावर १०७ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाल्यावर त्यानंतरच्याच षटकात अक्षय वखरेने यजुवेंद्रला यष्टिचीत करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा