अविष्कार देशमुख

चेतेश्वर पुजारा आमचा एकमेव लक्ष्य असल्याचे विदर्भाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने सांगितले. मात्र सौराष्ट्र संघ केवळ पुजाराच्या बळावर अंतिम सामन्यात दाखल झाला नसून संघातील इतरही फलंदाजांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे विदर्भाला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये गाफील राहून चालणार नाही.

रविवारी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मदानावर विदर्भ आणि सौराष्ट्रात विजेतेपदासाठी झुंज रंगणार आहे. विदर्भ लागोपाठ दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचला असून घरच्या मदानावर मात्र पहिल्यांदाच अंतिम सामना खेळत आहे. त्यामुळे गृहमदानाच्या हिरव्यागार खेळपट्टीचा फायदा विदर्भाला मिळण्याची शक्यता आहे.

गतवर्षी रणजी करंडकापाठोपाठ इराणी चषक जिंकणाऱ्या विदर्भाला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी असली तरी सौराष्ट्र रणजी करंडकावर पहिल्यांदा नाव कोरण्यास उत्सुक आहे.

कर्णधार फैज फजलच्या नेतृत्वाखाली विदर्भाने उपांत्य सामन्यात दुसऱ्याच दिवशी केरळचा त्यांच्याच मदानावर एक डाव व ११ धावांनी पराभव करून अंतिम लढतीपूर्वीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल दिला आहे. फलंदाजीत अनुभवी वसीम जाफर, फैज, यष्टीरक्षक अक्षय वाडकर, गणेश सतीश यांच्या कामगिरीत सातत्य दिसत आहे.

* सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

Story img Loader