Vidarbha Ranji Trophy Champion Karun Nair Century: कर्णधार करुण नायरच्या खणखणीत शतकाच्या बळावर विदर्भने तिसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. संपूर्ण हंगामात अपराजित राहत विदर्भने जेतेपदाचे खरे दावेदार असल्याचं सिद्ध केलं. अंतिम लढतीच्या शेवटच्या दिवशी विदर्भने २४९/४ वरून पुढे खेळायला सुरुवात केली. विदर्भने नियमित अंतरात विके्स गमावल्या पण धावाही केल्या आणि आघाडी वाढवत नेली. यामुळे सामना केरळच्या विजयाच्या शक्यता मावळत गेल्या.

१० चौकार आणि २ षटकारांसह १३५ धावांची मॅरेथॉन खेळी करून करुण नायर तंबूत परतला. ७/२ अशा स्थितीत खेळायला आलेल्या करुणने अनुभव पणाला लावत संयमी शतकी खेळी साकारली. करुण खेळायला मैदानात उतरला तेव्हा सामन्याचं पारडं दोलायमान होतं पण करुणने चिवटपणे खेळ करत सामना विदर्भच्या बाजूने झुकवला. पहिल्या डावात धावचीत होण्याचं शल्य करुणने या खेळीद्वारे भरून काढलं. पहिल्या डावातील शतकवीर दानिश मालेवारने ७३ धावांची खेळी करत करुणला तोलामोलाची साथ दिली.

यश राठोड (२४), अक्षय वाडकर (२५), अक्षय कर्णेवार (३०), दर्शन नालकांडे ( ५१) यांनी छोट्या उपयुक्त खेळी करत आघाडी वाढवण्यात हातभार लावला. विदर्भने दुसऱ्या डावात ३७५ धावा केल्या. दोन्ही कर्णधारांच्या संमतीनंतर सामना अनिर्णित घोषित करण्यात आला आणि विदर्भच्या खेळाडूंनी जल्लोष केला.

पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या केरळने अंतिम लढतीत नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. विदर्भची पहिल्या डावात सुरुवात अतिशय डळमळीत अशी झाली होती. २४/३ अशा स्थितीतून मालेवार आणि करुण नायर यांनी चौथ्या विकेटसाठी २१५ धावांची भागीदारी करत डाव सावरला. मालेवारने १५ चौकार आणि ३ षटकारांसह १५३ धावांची दिमाखदार खेळी केली. करुण ८६ धावांवर बाद झाला. अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या नचिकेत भुटेने ३२ धावांची खेळी केली. केरळने निधीश आणि एडन अॅपल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

केरळने दुसऱ्या डावात ३४२ धावांची मजल मारली आणि विदर्भला महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. विदर्भकडून केरळ संघात दाखल झालेल्या आदित्य सरवटेने ७९ धावांची संयमी खेळी केली. कर्णधार सचिन बेबीचं शतक अवघ्या २ धावांनी हुकलं. विदर्भकडून दर्शन नालकांडे, हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. एकाक्षणी केरळ आगेकूच करणार असं वाटत असतानाच विदर्भच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत सामन्याचं पारडं फिरवलं. विदर्भला ३७ धावांची आघाडी मिळाली पण त्यांचीही दुसऱ्या डावात सुरुवात खराब झाली. पण करुण नायर आणि दानिश मालेवार यांनी डाव सावरत विदर्भच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Story img Loader