भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोन्ही तडाखेबंद फलंदाजी करणाऱ्यांनी शानदार शतके झळकावली. २६ धावांच्या पुढे खेळत गिलने दुसऱ्या दिवशी फूटवर्क आणि आक्रमकता जबरदस्त प्रदर्शन केले. या शतकी खेळीदरम्यान शुबमनने एक असा भन्नाट षटकार मारला की सगळेच आश्चर्याने पाहत होते.स्वत बेन स्टोक्सची या षटकारानंतरची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर चौथे षटक ६९८ कसोटी विकेट्स सह तगडा अनुभव असलेला जेम्स अँडरसन टाकत होता. त्याच्या जीवघेण्या वेगवान गोलंदाजीवर शुबमन गिलने ८५ मीटर लांब दणदणीत षटकार लगावला. अँडरसन रिव्हर्स स्विंग टाकण्याच्या तयारीत होता, मैदानही तसेच सेट केले होते. अँडरसनने चेंडू टाकताच गिलने थेट त्याच्या डोक्यावरून आश्चर्यचकित करणार षटकार लगावला. गिलने इंग्लंडच्या बॅझब़ॉलला आपल्या भाषेत खणखणीत उत्तर दिले होते. या सगळ्यासोबतच बेन स्टोक्सच्या प्रतिक्रियेने तो षटकार म्हणजे किती मोठी गोष्ट हे दाखवून दिले.

त्या षटकारानंतर अँडरसनही काहीसा गडबडला, तो सावध गोलंदाजी करू लागला. अँडरसनसाठी ही कसोटी मालिका फारशी चांगली राहिली नाही. राजकोट कसोटीत यशस्वी जैस्वालने षटकारांची हॅट्रिक करत अँडरसनला पार धुळीस मिळवले. यशस्वीनंतर गिलचा हा षटकार अँडरसनसह सगळ्याच चाहत्यांच्या कायम लक्षात राहिल.

दुसऱ्या दिवशी लंचब्रेक होईपर्यंत भारताने इंग्लंडने दिलेले २१८ धावांचे लक्ष्य गाठत त्यापुढे ४६ धावांची आघाडी मिळवली. रोहित आणि गिलच्या शतकाने आणि २०० पेक्षा अधिक धावांच्या भागीदारीने संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. बेन स्टोक्सने रोहितला तर जेम्स अँडरसनने शुबमन गिलला क्लीन बोल्ड करत भारताची मोठी भागीदारी तोडली. सध्या भारताचे युवा फलंदाज सर्फराज खान आणि पदार्पणवीर देवदत्त पडिक्कल क्रीजवर असून भारत ३०० धावांच्या जवळ पोहोचला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video