India vs England 5th Test Match Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने अद्याप गोलंदाजी केली नव्हती. नुकतेच त्याचे ऑपरेशन झाल्याने त्याला गोलंदाजी न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण धरशाला कसोटीतील दुसऱ्या दिवशी तो गोलंदाजी करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. दुसऱ्या दिवशी लंचनंतर पुन्हा खेळ सुरू होताच त्याने चेंडू हाती घेतला. प्रदीर्घ काळानंतर टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर बेन स्टोक्सने रोहित शर्माला त्रिफळाचीत करत त्याची शतकी खेळी संपुष्टात आणली.
जून २०२३ नंतर बेन स्टोक्सने प्रथमच केली गोलंदाजी –
बेन स्टोक्सने याआधी २०२३ मध्ये जून महिन्यात शेवटची कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र त्यानंतर संघाने अनेक चढउतार पाहिले, ज्यामध्ये काही सामने जिंकले तर काही गमावले. मात्र, स्टोक्सने स्वत:ला गोलंदाजीपासून दूर ठेवले. आज जेव्हा रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी लंचपर्यंत शतके पूर्ण केली आणि नाबाद राहिले, तेव्हा बेन स्टोक्सने स्वतः गोलंदाजीची जबाबदारी घेतली.
रोहित शर्माही झाला चकित –
बेन स्टोक्स प्रदीर्घ काळानंतर कशी गोलंदाजी करतो याकडे साऱ्या जगाच्या नजरा लागल्या होत्या. या काळात जवळपास ९ महिने ७ सामने झाले होते. रोहित शर्मा समोर होता. शतक पूर्ण करणारा रोहित मात्र स्टोक्सच्या या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. स्टोक्सचा हा गुड लेन्थ बॉल होता, जो पडल्यानंतर आतमध्ये आला आणि ऑफ स्टंपच्या वरच्या बाजूला आदळला. हा एक शानदार चेंडू होता, जो पाहून रोहितसह सगळेच चकित झाले. आऊट होण्यापूर्वी रोहित शर्माने १६२ चेंडूत १०३ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने १३ चौकार आणि ३ षटकार मारले.
हेही वाचा – सचिन तेंडुलकरची शंभरवी कसोटी खेळणाऱ्या विल्यमसन-साऊदीसाठी खास पोस्ट; म्हणाला, “ते न्यूझीलंड क्रिकेटचे…”
बेन स्टोक्सची कारकीर्द –
बेन स्टोक्सच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने १०१ सामन्यात १९८ विकेट्स घेतल्या आहेत. स्टोक्सने ११४ वनडे खेळताना ७४ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याने ४३ सामन्यात २६ विकेट्स घेतल्या आहेत. अशाप्रकारे पाहिले तर जगातील महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. बेन स्टोक्सने रोहित शर्माला बाद करताच काही वेळातच जेम्स अँडरसनने शुबमन गिलला बाद करून भारताला दिवसाचा दुसरा धक्का दिला.
हेही वाचा – IND vs ENG 5th Test : रोहित शर्माने बाबर-गेल यांना मागे टाकत ‘या’ खेळाडूच्या विक्रमाशी साधली बरोबरी
भारताला पाचवा धक्का –
भारताला ४०३ धावांवर पाचवा धक्का बसला. देवदत्त पडिक्कल १०३ चेंडूत ६५ धावा करून बाद झाला. त्याला शोएब बशीरने क्लीन बोल्ड केले. पडिक्कलने आपल्या खेळीत १० चौकार आणि एक षटकार लगावला. सध्या रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल क्रीजवर आहेत. पडिक्कलने पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली. त्याने सर्फराझ खानसोबत ९७ धावांची भागीदारी केली होती. सर्फराज ५६ धावा करून बाद झाला. भारताची आघाडी सध्या १८७ धावांची आहे.