Bangladesh Celebrity Cricket League: क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. भारतात क्रिकेटची विशेष पूजा केली जाते. एवढ्या मोठ्या खेळात छोटे-मोठे वाद होत असतील तर ती मोठी गोष्ट नाही. पण कधी कधी वाद खेळतानाही वाढतात. बांगलादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या लीगमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. चित्रपट निर्माते मुस्तफा कमाल राज आणि दीपंकर दीपोन यांच्यात बांगलादेशमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा सामना खेळला जात होता, पण त्याचदरम्यान असे काही घडले की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
सहा खेळाडू गंभीर जखमी
क्रिकेटच्या खेळाला जंटलमन्स गेम असे देखील म्हणतात, जिथे सर्व खेळाडू अंपायर्सचा निर्णय अंतिम मानतात, मग तो योग्य असो की अयोग्य. मैदानावर खेळादरम्यान खेळाडूंमध्ये जरी अनेकदा बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले असले तरी त्यांच्यात क्वचितच बाचाबाची झाली आहे. आता बांगलादेशमधून एक व्हिडीओ समोर आला आहे जो क्रिकेट आणि क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. येथे, सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या एका सामन्यादरम्यान, अंपायर्सच्या निर्णयावर खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल अशा स्वरुपाची जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. अक्षरशः क्रिकेटचे रुपांतर WWE मध्ये झाले त्यात खेळाडूंनी लाथा, ठोसे, बुक्के, क्रिकेटची बॅट आणि स्टंप यांनी मारामारी केली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या मारामारी दरम्यान सहा लोक गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नेमकं सामन्यात झालं काय?
माहितीसाठी की, हा सामना दोन्ही संघांमध्ये खेळला जात होता, परंतु वाद वाढत गेल्याने क्रिकेट स्पर्धेचे जागतिक कुस्ती मनोरंजन सामन्यात रुपांतर व्हायला वेळ लागला नाही. थर्ड अंपायरने चुकीचा निर्णय दिल्यानंतर दोन्ही संघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. अंपायरने चुकीचा निर्णय दिल्यानंतर दोन्ही संघांमध्ये चांगलीच जुंपली. खेळाडूंनी एकमेकांना बॅटने मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यामुळे अनेक खेळाडू गंभीर जखमी झाले. या हाणामारीत खेळाडू जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संघर्षामुळे उपांत्य फेरीपूर्वीच संपूर्ण स्पर्धा करण्यात आली आहे.
या सामन्यात खेळत असलेल्या राज रिपा यांनी सोशल मीडियावर आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “सामन्यादरम्यान काय झाले ते सर्वांनी पाहिले. चेंडू बाऊंड्री लाईनवर गेला होता पण व्यवस्थापनाने हे मान्य करण्यास नकार दिला. कमल राज यांच्या संघातील खेळाडू हे दारूच्या नशेत होते आणि त्यांनी पाण्याच्या बाटल्याही आमच्या संघातील खेळाडूंवर फेकल्या. त्यातून हा वाद आणखी चिघळत गेला.”
व्हिडीओमध्ये हाणामारी दिसत आहे
दोन्ही संघांमधील संघर्षाचा व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी कसे भांडत आहेत हे स्पष्टपणे पाहायला मिळते. यावेळी अनेक लोक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तरीही खेळाडू मारामारी करत राहिले. त्यामुळे अनेक खेळाडू जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.