युरो कप स्पर्धेमध्ये बेल्जियमने माजी विजेत्या पोर्तुगालच्या संघाचं आव्हान बाद फेरीमध्येच संपुष्टात आणलं आहे. सीव्हिला येथे झालेल्या बेल्जियम विरुद्ध पोर्तुगाल सामन्यामध्ये ब गटातील आपलं वर्चस्व कायम ठेवत बेल्जियमने १-० च्या फरकाने सामना जिंकत पोर्तुगालच्या संघाचं परतीचं तिकीट निश्चित केलं. बाद फेरीमधील तिन्ही सामने जिंकत बेल्जियमने उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे तर दुसरीकडे पोर्तुगलचा संघ अनपेक्षितरित्या स्पर्धेबाहेर फेकला गेलाय. या पराभवामुळे पोर्तुगालचा कर्णधार आणि स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो सामना संपल्यानंतर मैदानातच भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

नक्की वाचा >> Euro 2020 : बेल्जियमने केला चमत्कार; गतविजेता पोर्तुगाल स्पर्धेबाहेर

राऊण्ड ऑफ १६ म्हणजेच बाद फेरीत तिन्ही सामने बेल्जियमने जिंकले असून ते ब गटामध्ये अव्वल स्थानी आहेत. ग्रुप स्टेजेसच्या सामन्यात त्यांनी तीन सामन्यांमध्ये सात गोल केलेत. दुसरीकडे माजी विजेत्या पोर्तुगालच्या संघाने ग्रुप स्टेजेसमधील तीनपैकी एकच सामना जिंकता आला. बेल्जियम विरुद्ध पोर्तुगाल सामन्यामध्ये ४२ व्या मिनिटाला थोरगन हाझार्डने नोंदवलेला गोल हा सामन्यातील एकमेव गोल ठरला. थोरगन हाझार्डकडे आलेल्या पासचा त्याने योग्य उपयोग करत चेंडू गोलपोस्टच्या दिशेने धाडला आणि फर्स्ट हाफ संपण्यासाठी तीन मिनिटं बाकी असतानाच आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली, ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली आणि पोर्तुगालने सामना गमावला.

या सामन्यामध्ये पराभूत झाल्यानंतर रोनाल्डो भावूक झाल्याचं पहायला मिळालं. रोनाल्डो आता ३६ वर्षांचा असून हा त्याचा शेवटचा युरो कप असल्याचं सांगण्यात येत आहे. सामना संपल्याची शिट्टी वाजल्यानंतर निराश झालेल्या रोनाल्डोने आपल्या दंडावर बांधलेली पट्टी काढून जमीनीवर फेकली आणि तो गुडघ्यांवर खाली बसला. त्याचा कंठ दाटून आल्याचं आणि तो निराश होऊन काहीतरी बोलत असल्याचं कॅमेराने टिपलं. रोनाल्डोच्या चाहत्यांना हा पराभव मनाला चटका लावून गेला. मैदान सोडतानाही रोनाल्डोच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्टपणे दिसत होती. रोनाल्डोच्या चाहत्यांनी त्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत. रोनाल्डोने मैदानात केलेल्या या कृतीमुळे त्याचे चहातेही भावूक झाल्याचं आणि हळहळल्याचं ट्विटरवर पहायला मिळत आहे.

युरो कपच्या इतिहासामध्ये सर्वाधिक गोल करण्यापासून रोनाल्डो केवळ एक गोल मागे होता. मात्र आता त्याला यासाठी पुढच्या युरो कपपर्यंत थांबावं लागणार आहे. निराश झालेल्या रोनाल्डोला बेल्जियमच्या रोमेलू लुकाकूने आधार देण्याचा प्रयत्न केला. रोनाल्डोला मिठी मारत लुकाकूने त्याच्या कानामध्ये काहीतरी सांगितल्याचं दृष्यही कॅमेराने टिपलं. अनेकांनी या कृतीसाठी लुकाकूचं कौतुक केलं आहे.

यंदाच्या युरो कपमध्ये रोनाल्डोने एका पत्रकार परिषदेआधी टेबलावरील कोका कोलाची बाटली हटवली होती. याच कृतीमुळे रोनाल्डो चर्चेत आला होता. कोका कोलाला काही हजार कोटींचं नुकसान रोनाल्डोच्या या एका कृतीमुळं झालं होतं. टेबलावरील कोका कोलाच्या बाटल्या हटवत रोनाल्डोने पाणी प्या असं पाण्याची बाटली उंचवून सांगितलं होतं.

Story img Loader