न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने कसोटी क्रिकेटमध्ये १० बळी घेत अनिल कुंबळेची बरोबरी करत इतिहास रचला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या डावात एजाजने ही कामगिरी केली. त्याच्या १० विकेट्सच्या जोरावर न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावात ३२५ धावांत गुंडाळले.
भारताकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक १५० धावा केल्या. मुंबईत जन्मलेल्या एजाजने ४७.५ षटकात १२ मेडन्ससह ११९ धावा दिल्या आणि १० बळी घेतले. एजाज आता कसोटी क्रिकेटच्या एका डावात १० बळी घेणारा जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी भारताचा अनिल कुंबळे आणि इंग्लंडचा जिम लेकर यांनी एका डावात १० बळी घेतले होते.
मुंबई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पटेलने दुसऱ्याच षटकात करिष्मा दाखवत सलग दोन चेंडूत दोन बळी घेत भारताच्या आशांना मोठा धक्का दिला. पटेलने आधी साहाला एलबीडब्ल्यू आऊट केले, नंतर अश्विनला बाद केले. अश्विनला एजाजच्या गोलंदाजीवरुन विश्वासच बसत नव्हता की तो बाद झाला आहे. तर आऊट झाल्यावरही अश्विन काही वेळ क्रीजवर उभा राहिला.
PERFECT 10..! एजाज पटेलच्या भीमपराक्रमानंतर अनिल कुंबळेनं केलं ट्वीट; म्हणाला, ‘‘तुझं…”
मात्र एजाजच्या या विक्रमाचे अश्विनने कौतुक केले आहे. भारताचा डाव संपल्यानंतर मैदातून पॅव्हेलियनकडे परतणाऱ्या एजाजसाठी अश्विनने उभा राहून टाळ्या वाजवल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
३३ वर्षांच्या फिरकीपटू एजाज पटेलचा जन्म मुंबईत झाला. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत त्यांचे वास्तव्य मुंबईतील जोगेश्वरी येथे होते. १९९६ मध्ये त्याचे आई-वडील न्यूझीलंडला गेले. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात एजाज पटेलने भारतीय कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, मोहम्मद सिराज आणि मयंक अग्रवाल यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कोहली, पुजारा आणि अश्विन यांना खातेही उघडता आले नाही.
एजाजच्या आधी अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध एका डावात १० बळी घेतले होते. मुंबईत जन्मलेला न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाजने मुंबईतच ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने प्रथम सहा विकेट्स घेतल्या आणि नंतर उर्वरित चार विकेट्स घेत एका डावात सर्व १० विकेट्स घेतल्या. एजाजच्या आधी १४१ वर्षांच्या कसोटी इतिहासात एका डावात १० बळी घेणारे दोनच गोलंदाज होते.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात १० बळी घेण्याचा विक्रम पहिल्यांदा इंग्लंडच्या जिम लेकर यांच्या नावावर होता. त्यांनी १९५६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीच्या एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. लेकर यांच्या या विक्रमाची १९९९ मध्ये भारतीय लेगस्पिनर अनिल कुंबळेने बरोबरी केली होती. दिल्लीत पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात कुंबळेने एका डावात सर्व १० फलंदाजांना बाद केले होते.