IND vs PAK Asia Cup 2022: भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेतून बाहेर झाला आणि आजच्या पाकिस्तान विरुद्ध सामन्यात दीपक हुडाला नामी संधी मिळाली. मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवणं म्हणजे काय हे हुडाने आजच्या सामन्यात सिद्ध करून दाखवलं आहे. विराट कोहलीच्या सर्वाधिक धावा, बिष्णोईने शेवटी दोन चौकार मारत भारताला १८०च्या पार नेणं या साऱ्या कमाल क्षणांसोबतच हुडाचा तो एक शॉट सर्वांच्या नेहमीच लक्षात राहणार आहे. जवळजवळ धनुरासन करत हुडाने चेंडू असा काही भिरकावला की थेट भारताच्या खात्यात चार धावांची भर पडली. (भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे LIVE अपडेट्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा.)
दीपक हुडाने आयपीएलच्या हंगामात उत्तम कामगिरी केली होती. याच वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आजच्या पाकिस्तान विरुद्ध सामन्यात दीपक हुडाने मारलेला शॉट हा जवळजवळ अशक्यच भासत होता त्यामुळे चेंडू भिरकावल्यावर काही वेळ पाकिस्तानी टीम सुद्धा गोंधळून गेली आणि इतक्यात चिंधू थेट सीमारेषेच्या बाहेर पोहचला होता .
दीपक हुडाचा व्हायरल शॉट
दीपक हुडाने मारलेला पाहून मैदानात सर्वचजण थक्क झाले होते. अनेकांनी हा फोटो शेअर करून हुडाचे कौतुक केले आहे. पण चौकार मारताच हुडाला विराट कोहलीने दिलेली प्रतिक्रिया अगदी खास ठरली. विराटने “चौका मारा” असं म्हणत हुडाला मिठी मारली.
यापूर्वीच्या सामन्यात रवींद्र जडेजाच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेलला संधी देण्यात आली होती. अक्षरने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. पण दीपक हुडाला संघात संधी दिल्यास त्याच्यामुळे भारताची फलंदाजी अधिक मजबूत होईल, असा विश्वास माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे, कोहली आता टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणारा खेळाडू बनला आहे. यासोबतच त्याने कर्णधार रोहितलाही मागे टाकले आहे. रोहितच्या नावावर टी-२० मध्ये ३१ अर्धशतक आहेत. या सामन्यात कोहलीने ६० धावा केल्या. त्याने ४४ चेंडूत चार चौकार आणि एक षटकार ठोकला. भारताने पाकिस्तानला १८२ चे मोठे लक्ष्य दिले आहे.