आशिया चषक स्पर्धेमध्ये अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या भारत-पाकिस्तान सामना भारताने पाच गडी राखून जिंकला. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांप्रमाणे आजची सायंकाळ पवार कुटुंबियांनीही भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखून ठेवल्याचं या व्हिडीओवरुन दिसून येतं. सामना जिंकल्यानंतरचा जल्लोष कसा होता हे सुप्रिया यांनी या व्हिडीओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
नक्की वाचा >> IND vs PAK Asia Cup: जय शाहांमुळे संजय मांजरेकर ट्रोल; मांजरेकरांची ‘ही’ दोन विधानं ठरली कारण; अनेकांनी व्यक्त केली नाराजी
सुप्रिया सुळे यांनी सामना संपल्या संपल्या ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबातील इतर मंडळी टीव्हीसमोरील डायनिंग टेबलजवळ बसून समन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. शेवटच्या तीन चेंडूंमध्ये सहा धावांची गरज असताना हार्दिक पंड्याने षटकार लगावत सामना जिंकून दिल्यानंतर शरद पवारांनी हात उंचावून जल्लोष साजरा केला. “भारतीय क्रिकेट सांघाचे आभार त्यांनी भारतासाठी हा रविवार एकदम आनंददायी केला त्याबद्दल” अशा कॅप्शनसहीत सुप्रिया यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच ट्विटरवरुन भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. टी-२० विश्वचषकामध्ये भारताचा पाकिस्तानने १० गडी राखून दारुण पराभव केला होता. त्याचा वचपा भारताने या सामन्यामध्ये काढला. या विजयानंतर काही मिनिटांमध्येच पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
नक्की वाचा >> IND vs PAK T20 Asia Cup: …म्हणून ऋषभ पंत भारत-पाक सामन्यातून बाहेर; मैदानातील ‘या’ अभिनेत्रीला ठरवलं जातंय दोषी
भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी केल्याचं मोदींनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. “आजच्या आशिया चषकाच्या सामन्यात भारतीय संघाने उत्तम अष्टपैलू कामगिरी केली. भारतीय संघाने उत्तम कौशल्य आणि चिकाटी दाखवली. विजयाबद्दल त्याचं अभिनंदन,” असं मोदींनी म्हटलं आहे.
आशिया चषक स्पर्धेतील बहुचर्चित अशा भारत-पाक सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य भारताने पाच गडी राखून गाठले. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात आपली भूमिका चोखपणे बजावली. त्याने गोलंदाजीमध्ये तीन गडी बाद करून पाकिस्तान संघाला रोखलं तर भारताची स्थिती बिकट झालेली असताना त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावत ३३ धावा केल्या.