Australian fans announce India Jitega Video Viral: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने ४६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला आपल्या पहिल्या डावात २९६ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ८ बाद २७० धावांवर आपला डाव घोषित केला. तसेच भारतीय संघाला ४४४ धावांचे लक्ष्य दिले आहे. या दरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन चाहते ‘इंडिया जितेगा’च्या घोषणा देताना दिसत आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांना पराभूत करण्यात गुंतले आहेत. त्याचबरोबर या मोठ्या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघ पिछाडीवर पडल्याचे दिसत आहे. असे असतानाही संघाला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ऑस्ट्रेलियन चाहत्यांकडून टीम इंडियाला सपोर्ट –
दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय चाहत्यांशिवाय ऑस्ट्रेलियन चाहतेही टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ‘भारत आर्मी’ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऑस्ट्रेलियन चाहते भारतीय चाहत्यांसोबत बसून ‘जीतेगा भाई जीतेगा इंडिया जीतेगा!’ अशा घोषणा देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या या व्हिडीओचे सर्वजण कौतुक करत आहेत.
ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला –
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात हेड आणि स्मिथच्या शतकाच्या जोरावर १२१.३ षटकांत सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुरच्या अर्धशतकांच्या जोरावर ६९.४ षटकांत सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने अॅलेक्स कॅरीच्या अर्धशतकाच्या जोरावर ८४.३ षटकांत ८ बाद २७० धावांवर डाव घोषित केला. तसेच भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले.