Babar Azam at the non strike end stopping Shan Masood’s ball : विश्वचषक २०२३ मधील निराशाजनक कामगिरी मागे टाकत पाकिस्तानी संघ क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये कांगारूचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. १४ डिसेंबरपासून दोन्ही संघांमधील कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्याआधी, ऑस्ट्रेलियन वातावरणाची चांगली ओळख होण्यासाठी पाकिस्तान संघ पंतप्रधान इलेव्हनसोबत चार दिवसीय सराव सामना खेळत आहे. या सामन्यातील बाबर आझमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तान संघाचा कर्णधार शान मसूद जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. संघाचे इतर फलंदाज विरोधी संघाच्या गोलंदाजांसमोर प्रत्येक धावांसाठी झगडत होते. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १५६ धावांची नाबाद शतकी खेळी केली. या दरम्यान त्याच्या बॅटमधून १३ चौकार आणि एक उत्कृष्ट षटकार आला. सामन्यादरम्यान त्याने अनेक उत्कृष्ट शॉट्स मारले. ज्यामुळे त्याचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे. अशात माजी कर्णधार बाबर आझमचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माजी कर्णधार बाबर आझम असे काही करताना दिसत आहे, जे पाहून चाहते हसू रोखू शकले नाहीत. वास्तविक, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बाबर आझम आणि नवा कर्णधार शान मसूद खेळपट्टीवर दिसत आहेत. यादरम्यान मसूदने ब्यू वेबस्टरच्या एका चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्ह मारला. दरम्यान, नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला बाबर आझम धाव घेण्यासाठी धावण्याऐवजी थांबून चेंडू पकडताना दिसला.
हेही वाचा – ICC Rankings : राशिद खानला मागे टाकत रवी बिश्नोई ठरला टी-२० क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज, पाहा क्रमवारी
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत एक्स खात्यावरून या क्षणाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना बोर्डाने लिहिले आहे की, ‘बाबर आझम नॉन-स्ट्रायकर एंडवरही खेळात सक्रिय आहे.’ सराव सामन्यातील बाबर आझमच्या कामगिरीबद्दल सांगायचे, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने एकूण ८८ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, तो ४५.४५ च्या स्ट्राइक रेटने ४० धावा करण्यात यशस्वी झाला. या काळात त्याच्या बॅटमधून पाच चौकार आले.