Base Day Lead hitting the eye video viral: शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नेदरलँड्सच्या बेस डे लीडने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्याने प्रथम गोलंदाजी करताना ६२ धावांत चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना डी लीडने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने ६८ चेंडूंचा सामना करत ६७ धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले. यातील एका षटकाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उजव्या हाताच्या फलंदाजाने अनेक उत्कृष्ट फटके खेळले. त्याने हारिस रौफच्या षटकातही एक सुरेख षटकार मारला. हे नेदरलँड्सच्या डावातील हे २९ वे षटक होते. यानंतर त्याने पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला. बेस डे लीडने शानदार षटकार मारल्यानंतर हारिस रौफला डोळा मारला. या घटनेचा व्हिडीओ आयसीसीने शेअर केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बेस डे लीडने आपल्य फलंदाजीने एका अनोख्या यादीत आपले नाव नोंदवले. विश्वचषक पदार्पणात चार विकेट्स घेऊन अर्धशतक करणारा तो जगातील केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम झिम्बाब्वेच्या डंकन फ्लेचर (१९८३) आणि नील जॉन्सन (१९९९) यांनीही केला होता.

हेही वाचा – Asian Games: भारतीय महिला कबड्डी संघाची सुवर्ण कामगिरी, टीम इंडियाने पूर्ण केले पदकांचे शतक

डी लीडने विक्रमजीत सिंगसह ७६ चेंडूत ७० धावांची भागीदारी केली. विक्रमजीत सिंगनेही ६७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. या भागीदारीमुळे नेदरलँडला १०० धावांचा टप्पा पार करता आला. याआधी त्याने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली होती. त्याने मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान आणि हसन अली यांच्या विकेट घेतल्या. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४९ षटकांत २८६ धावा करून बाद झाला. ज्यामध्ये लीडने ६२ धावांत चार गडी बाद बाद केले.

हेही वाचा – शतकवीर भारत! आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची शंभरी पार करत घडवला इतिहास!

सामन्याबद्दल बोलायचे, तर हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि नेदरलँडसचे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा ८१ धावांनी पराभव केला. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ४९ षटकांत २८६ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ ४१ षटकांत २०५ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून अर्धशतक झळकावणाऱ्या सौद शकीलची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of haris rauf eyeballing the base day lead after hitting a six went viral in pak vs ned match vbm