African Cricketer Keshav Maharaj Video Viral : बहुप्रतिक्षित भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. यानिमित्ताने अयोध्या नगरीसह देशभरातील अनेक महत्त्वाची शहरे, ग्रामीण भाग सजले आहेत. ठिकठिकाणी दिवाळीचा जल्लोष सुरू झाला आहे. अशात दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर केशव महाराजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये केशव महाराज अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी शुभेच्छा देत आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर केशव महाराज व्हिडीओत म्हणताना ऐकू येत आहे की, ‘तुम्हा सर्वांना नमस्कार. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या वतीने अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.’ आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर युजर्सही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.
केशव महाराजचा व्हिडीओ व्हायरल –
आता केशव महाराजांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स केशव महाराजांच्या व्हिडिओवर सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. वास्तविक केशव महाराज अनेकदा मंदिरात पूजा करताना दिसला आहे. नुकतेच केशव महाराजने भारतातील मंदिरांना भेट दिली होती.
या क्रिकेटपटूंना मिळाले निमंत्रण –
२२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. याशिवाय अनेक क्रिकेटपटूंसह इतर क्षेत्रातील दिग्गजांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या यादीत सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, कपिल देव आणि सुनील गावसकर यांसारख्या क्रिकेटपटूंच्या नावांचा समावेश आहे.