KL Rahul and Rohit Sharma with the trophy Video Viral: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना राजकोट येथे खेळला गेला. या सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा ६६ धावांनी पराभव केला. मात्र, या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. अशाप्रकारे पराभवानंतरही भारतीय संघाने मालिका २-१ अशी जिंकली. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल दिसत आहेत.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल –
वास्तविक, मालिकेची ट्रॉफी भारतीय कर्णधार रोहित शर्माकडे सुपूर्द करण्यात आली. पण रोहित शर्माने केएल राहुलकडे ट्रॉफी दिली. रोहित शर्माच्या या कृतीने सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स रोहित शर्माचे सतत कौतुक करत आहेत.
पहिल्या २ सामन्यात केएल राहुल होता कर्णधार –
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलने कर्णधाराची भूमिका बजावली. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मोहालीत ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्स राखून पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ९९ धावांनी पराभव केला. मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी भारतीय संघाने ३ सामन्यांची मालिका २-१अशी जिंकली.
हेही वाचा – Asian Games: भारताने नेमबाजीत पटकावले चौथे सुवर्णपदक; सरबजोत, अर्जुन आणि शिवाची कमाल
टीम इंडियाला करता आली नाही विजयाची हॅट्ट्रिक –
भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मोहम्मद सिराज बाद होणारा संघाचा शेवटचा फलंदाज होता. ५० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कॅमरून ग्रीनकरवी त्याला कर्णधार पॅट कमिन्सने झेलबाद केले. सिराजने आठ चेंडूत एक धाव काढली. प्रसिद्ध कृष्णा खातेही न उघडता नाबाद राहिला.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत सात गडी गमावून ३५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ४९.४ षटकांत २८६ धावांवर गारद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८१ धावा केल्या. विराट कोहलीने ५६ धावांची आणि श्रेयस अय्यरने ४८ धावांची खेळी खेळली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही. रवींद्र जडेजाने ३५ आणि केएल राहुलने २६ धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदर सलामीला आला आणि १८ धावा करून बाद झाला.