Nathan Lion came out to bat while injured: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसरी कसोटी लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, शनिवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले. एक दिवसापूर्वी क्रॅचेसच्या सहाय्याने चालणारा नॅथन लायन चक्क बॅट घेऊन फलंदाजीला पोहोचला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जोश हेझलवूडच्या रूपाने ऑस्ट्रेलियन संघाने नववी विकेट गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव संपला असे मानले जात होते, पण शेवटचा फलंदाज म्हणून नॅथन लायन क्रिजवर आला. दुखापतग्रस्त लायनच्या या धाडसाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. त्याचबरोबर टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन दिले. मात्र, लायन केवळ ४ धावा करून बाद झाला. त्याला स्टुअर्ट ब्रॉडने कर्णधार बेन स्टोक्सच्या हाती झेलबाद केले.
नॅथन लायन तिसऱ्या दिवशी क्रॅचच्या सहाय्याने लॉर्ड्स मैदान पोहोचला होता. दुखापतग्रस्त असूनही ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज खेळाडू संघासोबत कायम राहिला. खेळाच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने नऊ विकेट गमावल्या असताना, संघाला फलंदाजी करणे आवश्यक असताना, लायनने पुन्हा एकदा धैर्य दाखवले आणि मैदानावर पाऊल ठेवले.
हेही वाचा – सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानचे पथक लवकरच भारतात; एकदिवसीय विश्वचषकाच्या केंद्रांची चाचपणी
जेव्हा तो फलंदाजीसाठी आला तेव्हा मैदानावर उपस्थित असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी त्याला जोरदार प्रोत्साहन दिले. त्याने केवळ चार धावांची इनिंग खेळली असली तरी त्याने आपल्या धाडसाने लोकांची मने जिंकली. सामन्याच्या दुस-या दिवशी क्षेत्ररक्षण करताना नॅथन लायनला दुखापत झाली होती, त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून अॅशेस मालिकेतील त्याच्या उर्वरित खेळण्याची शक्यता कमी आहे.
सामन्याबद्दल बोलायचे तर, शनिवारी (१ जुलै) सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने दुसऱ्या डावात ४ बाद ११४ धावा केल्या आहेत. त्याला पाचव्या दिवशी विजयासाठी २५७ धावा कराव्या लागतील. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाला सहा विकेट्सची गरज आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात २७९ धावांत गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला एकूण ३७० धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडला विजयासाठी ३७१ धावांचे लक्ष्य मिळाले. याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या होत्या. त्याचवेळी इंग्लंडचा संघ ३२५ धावांवर गारद झाला. पहिल्या डावात ते ९१ धावांनी पिछाडीवर होते.