Gautam Gambhir S Sreesanth Sledging In LLC Eliminator Match : भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक सलामीवीर गौतम गंभीर सध्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये इंडिया कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. या टूर्नामेंटमध्ये गंभीरची बॅट धावांचा पाऊस पाडत आहे. गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील पहिला एलिमिनेटर सामना अतिशय रोमांचक झाला. सुरतमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात जायंट्सकडून खेळणारा गौतम गंभीर आणि टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत यांच्यात वाद झाला. दोघांतील शाब्दिक वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लालाभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर झालेल्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्सचे संघ आमनेसामने होते. सामन्याच्या दुसऱ्या षटकात गौतम गंभीर स्ट्राइकवर असताना ही घटना घडली. वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. गंभीरने पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवत षटकार मारला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर चौकार मारला. पुढचा चेंडू डॉट होता. यानंतर श्रीसंत पुढे गेला आणि गंभीरकडे पाहू लागला. मग गंभीरनेही श्रीसंतला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, प्रकरण फार पुढे न घेऊन जाता दोघेही शांत झाले. श्रीसंतने ३ षटकात ३५ धावा देऊन १ विकेट घेतली.
गौतम गंभीरने खेळली ५१ धावांची खेळी –
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली इंडिया कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा १२ धावांनी पराभव केला. गंभीरने ३० चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली. इंडिया कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २२३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ख्रिस गेलच्या ८४ धावांच्या खेळीनंतरही गुजराजच्या संघाला विजयाची नोंद करता आली नाही. केविन ओब्रायनने ३३ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. रस्टी थेरॉन आणि ईश्वर पांडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
हेही वाचा – ‘Handling the Ball’ म्हणजे काय? मुशफिकुर रहीमच्या विकेटवरून गोंधळ; जाणून घ्या आयसीसीचा संपूर्ण नियम
सामन्यानंतर श्रीसंतने शेअर केला व्हिडीओ –
सामन्यानंतर, श्रीसंतने सोशल मीडियावर त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तो म्हणाला की त्याला वीरू इत्यादी वरिष्ठ खेळाडूंबद्दल खूप आदर आहे. तो म्हणाला की यात माझी चूक नाही पण मिस्टर फायटर अर्थात गौतम गंभीरने क्रिकेटच्या मैदानावर लाइव्ह मॅचमध्ये जी भाषा वापरली होती, ती सहन करण्यासारखी नव्हती. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज म्हणाला की, आज नाही तर उद्या गंभीर काय बोलला ते समोर येईल.