दक्षिण आफ्रिकेचा झंझावाती माजी फलंदाज अब्राहम डीव्हिलियर्स याने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली. त्यामुळे क्रिकेटप्रेमी हळहळले. पण डीव्हिलियर्सने आंतराराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले असले, तरी तो जगभरातील विविध टी२० स्पर्धांमध्ये मात्र खेळत आहे. त्यातच डीव्हिलियर्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांना त्याला पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहता येणार आहे.

पाकिस्तान सुपर लीग या टी२० स्पर्धेसाठी डीव्हिलियर्स पाकिस्तानात येणार आहे. २००७ साली आफ्रिकेचा संघ शेवटचा पाकिस्तानात आला होता. त्यानंतर प्रथमच डीव्हिलियर्स पाकिस्तानात खेळणार आहे. लाहोर कलंदर्स या संघाकडून तो खेळणार आहे. या संघाचे दोन सामने इस्लामाबाद युनायटेड आणि मुलतान सुलतान्स यांच्याविरुद्ध लाहोरला होणार आहेत. या २ सामन्यांसाठी तो लाहोरच्या संघाकडून खेळणार असल्याचे समजत आहे. या संदर्भात त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला आहे.

९ आणि १० मार्च रोजी होणाऱ्या दोन सामन्यांना डीव्हिलियर्स ‘लाहोर’कडून खेळणार आहे. या बरोबरच त्या व्हिडिओत त्याने ‘मैं आ रहा हूँ’ असा संदेश दिला आहे. तसेच ‘मी २००७ साली पाकिस्तानात आलो होतो तेव्हा तेथे आम्हाला खूप पाठिंबा मिळाला होता. पाकिस्तान हा क्रिकेटचा चाहता असेलला देश आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा पाकिस्तानात क्रिकेट खेळायला येत आहे’, असेही त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

Story img Loader