पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) च्या चालू हंगामात, सोमवारी पेशावर झाल्मी आणि लाहोर कलंदर यांच्यातील सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यादरम्यान लाहोर कलंदरचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने विकेट घेतल्यानंतर त्याचा सहकारी कामरान गुलामला खानाखाली मारली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यासाठी क्रिकेट चाहते हॅरिस रौफवर टीका करत आहेत.

पेशावर झल्मीच्या डावाच्या दुसऱ्या षटकात ही घटना घडली. हारिस रौफ गोलंदाजी करत होता. त्याच्या एका चेंडूवर कामरान गुलामने पेशावर झल्मीचा सलामीवीर हजरतुल्ला जझाईचा झेल सोडला. रौफ हे पाहून खूप संतापला. तेव्हा त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्याच षटकात रौफने मोहम्मद हारिसला बाद केले आणि सर्व खेळाडू आनंद साजरा करण्यासाठी त्याच्याकडे आले. तेव्हा रौफने कामरान गुलामला कानाखाली मारली. मोहम्मद हारिस सहा धावा करून रौफच्या चेंडूवर फवाद अहमदकडे झेल देऊन बाद झाला. कामरानने पेशावर झल्मीचा सलामीवीर हजरतुल्ला झाझाईचा झेल सोडला होता, जो नंतर १६ चेंडूत २० धावा करून मोहम्मद हाफिजचा बळी ठरला.

हारिसच्या या कृतीने सहकारी खेळाडूंना धक्काच बसला, पण कामरान गुलामने ते अगदी सहजतेने घेतले. कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याने हसत हसत हारीसला ढकलले. यानंतर बाकीचे खेळाडूही हसायला लागले. हारिसच्या चेहऱ्यावरही हलके हसू आले.

हारिसच्या विकेटचा व्हिडिओ पाकिस्तान सुपर लीगच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रौफने कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीसमोर कामरानला मारले. सामन्यात पेशावर झल्मीने २० षटकांत ७ बाद १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात लाहोर कलंदरनेही २० षटकांत आठ गडी गमावून तेवढ्याच धावा केल्या. त्यानंतर पेशावर झल्मीने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला.

Story img Loader