अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये दिवसोंदिवस चुरस वाढताना दिसत आहे. असाच एक रंजक सामना इटलीच्या फॅबिओ फॉगनिनी आणि राफेल नदालमध्ये आज झाला. या सामन्यामध्ये नदालने यशस्वीपणे फॉगनिनीचं आव्हान परतून लावलं. मात्र या सामन्यात एका क्षणी नदालने स्वत:लाच गंभीर जखमी करुन घेतलं. नदालच्या नाकावर टेनिसचं रॅकेट लागल्याने त्याला जखम झाली आणि रक्त वाहू लागलं. नदाल रॅकेट नाकावर लागल्यानंतर कोर्ट सोडून बाहेर गेला आणि झोपला. त्यानंतर तातडीने डॉक्टर आले आणि त्यांनी नदालवर प्रथमोपचार केले. एवढ्या साऱ्या गोंधळानंतरही नदालने सामना पूर्ण करत २-६, ६-४, ६-२, ६-१ ने जिंकला.
शेवटच्या सेटमध्ये नदाल ३-० ने पुढे असतानाच हा विचित्र अपघात घडला. नदालने उजवीकडे जात हात लांब करुन चेंडू परत टोलवला. त्यानंतर त्याचं रॅकेट कोर्टवर आदळलं आणि थेट त्याच्या नाकाला लागलं. प्रेक्षकांना काही कळण्यापूर्वीच नदालने खेळ थांबवला. रॅकेट टाकलं आणि तो नेटच्या बाजूला असणारा पंचांच्या कक्षाजवळ जाऊन पाठ ठेकवून झोपला. नदलला दुखापत झाल्याचं पाहून फॉगनिनीही तेथे धावत आला. त्यानंतर डॉक्टरांनी येऊन नदालच्या नाकावरील रक्त पुसलं आणि प्रथामोपचार केले. त्यानंतर नदाल पुन्हा खेळण्यासाठी उभा राहिला तेव्हा प्रेक्षकांनी त्यांच्या जिद्दीला दाद दिल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान नदालच्या नाकाला रॅकेट कसं लागलं हे स्लो मोशनमध्ये मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आल्यानंतर प्रेक्षकांनी एकाच वेळी ‘ओहहह..’ असं म्हणत आश्चर्य व्यक्त केलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून जगातील अव्वल खेळाडूंपैकी एक असणारा नदाल अशापद्धतीने स्वत:ला दुखापत करुन घेतल्याने समालोचकांनाही आश्चर्य व्यक्त केलं. मात्र अशा वेळी शरीर वेगाने चेंडू किंवा रॅकेटपासून बाजूला घेण्याऐवजी खेळावर लक्ष्य केंद्रीत केलेलं असतं त्यामुळे असे प्रकार घडतात असंही एका समालोचकाने निरिक्षण नोंदवताना म्हटलं. तर अन्य एकाने रिफ्लेक्स अॅक्शन म्हणजेच प्रतिसाद हा चेंडूवर लक्ष केंद्रित करु असतो असं म्हटलं.
या दुखापतीनंतरही नदालने पुढील तीन पॉइण्ट मिळवत चौथा सेटही आपल्या नावावर करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.