बांग्लादेशात सुरु असलेल्या ढाका प्रिमियर लिग मध्ये अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने केलेल्या वर्तनावरुन सर्वच स्तरावरुन टीका केली जात आहे. शाकिब अल हसनने सामन्यादरम्यान अंपायरच्या नॉट आऊटच्या निर्णयावर नाराजी व्यक्त स्टंपवर लाथ मारली आणि नंतर त्या सर्व स्टंप्स काढून फेकून दिल्या. आपल्या एलबीडब्लूच्या अपीलवर अंपायरनी नॉट आऊटचा निर्णय दिल्यानंतर शाकिबने हे कृत्य केलं. त्यानंतर शाकिब हसनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

बांग्लादेशात सुरु असलेल्या ढाका प्रिमियर लिग टी-२० स्पर्धेदरम्यान हा प्रकार घडला. मोहमद्दन स्पोर्टिंग क्लब आणि अबाहानी लिमिटेड या दोन संघादरम्यान सामना सुरु होता. मोहमद्दन स्पोर्टिंगचा खेळाडू शाकिब हसनने अबाहानी लिमिटेडच्या मुश्फिकुर रहीम याच्याविरोधात एलबीडब्लूचे अपील केलं. त्यावर अंपायरनी नॉट आऊटचा निर्णय घेतला. अंपायरच्या या निर्णयावर शाकिबने त्यांच्याशी वाद घातला आणि स्टंपवर लाथ मारली.

या सामन्याचा आणखी एका व्हिडीओमध्ये अंपायरने नॉट आऊटचा निर्णय दिल्यानंतर शाकिबला संताप अनावर झाल्याचे दिसत आहे. नॉट आऊटचा निर्णय दिल्यानंतर शाकिबने अंपायरशी वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात शाकिबने तिनही स्टंप्स काढून टाकल्या आणि त्या पीचवर फेकल्या. शाकिबच्या कृतीमुळे आता सोशल मीडियामध्ये त्यावर टीका केली जात आहे. कायमस्वरुपी बंदी आणावी अशी मागणीदेखील क्रिकेट चाहत्यांनी बांग्लादेश क्रिकेट बोर्डकडे आणि आयसीसीकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची चर्चा होऊ लागल्यानंतर शाकिब हसनने आता क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली आहे. यापुढे अशा पद्धतीची घटना पुन्हा होणार नाही असं शाकिबने सांगितलं आहे.

Story img Loader