आयसीसी टी २० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा ५ गडी राखून इंग्लडला पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. १६७ धावांचे लक्ष्य किवी संघाने १९ षटकांत पाच गडी गमावून पूर्ण केले. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने नाबाद ७२ आणि डेव्हन कॉनवेने ४६ धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी, सामन्यादरम्यान असे काही घडले, जे पाहून चाहत्यांना २०१९च्या विश्वचषक फायनलमध्ये घडलेली एक घटना आठवली. लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्याची आता या सामन्यासोबत तुलना केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूझीलंडच्या डावादरम्यान, १७व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर, जिमी नीशामने ख्रिस जॉर्डनच्या लॉग ऑनवर एक जोरदार शॉट मारला, जो थेट सीमारेषेच्या बाहेर जात होता. यावेळी जॉनी बेअरस्टोने बाऊंड्री लाईनवर झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वीही झाला, पण हा झेल घेताना सीमारेषेबाहेर जात असताना त्याने चेंडू लियाम लिव्हिंगस्टोनच्या दिशेने फेकला. यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी सेलिब्रेशन करायला सुरुवात केली, पण रिप्लेने स्पष्ट केले की बेअरस्टोच्या शरीराने चेंडू सोडण्यापूर्वी सीमारेषेला स्पर्श केला होता. नीशाम थोडक्यात बचावला आणि त्यानंतर त्याने एका षटकारासह आणखी १० धावा केल्या. नाबाद ठरल्यानंतर नीशामने वादळ निर्माण केले आणि वेगवान धावा करत सामनाच न्यूझीलंडच्या बाजून फिरवला.

इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन १७वे षटक टाकत होता. जिमी निशामने हा चेंडू जोरात मारला आणि चेंडू हवेत गेला. बेअरस्टो चेंडूखाली धावत आला आणि झेल टिपण्यात यशस्वी झाला. डायव्ह मारताना त्याने कॅच पकडला आणि खाली पडण्यापूर्वी चेंडू लियाम लिव्हिंगस्टोनला दिला आणि यादरम्यान त्याचा गुडघा सीमारेषेला लागला जो रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होता.

२०१९च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही असेच काहीसे घडले. ४९व्या षटकात बेन स्टोक्सने जिमी नीशामच्या चेंडूवर जोरदार फटका मारला आणि चेंडू हवेत गेला. ट्रेंट बोल्टने तो झेल मागे धावत पकडला पण त्याचा पाय सीमारेषेला लागला आणि त्यामुळे स्टोक्स वाचला आणि इंग्लंडला महत्त्वाच्या सहा धावा मिळाल्या. नंतर इंग्लंडने हा सामना जिंकून प्रथमच एकदिवसीय विश्वचषक जिंकला.

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत चार बाद १६६ धावा केल्या. संघाकडून मोईन अलीने नाबाद ५१ आणि डेव्हिड मलानने ४२ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदी, इश सोधी आणि अॅडम मिल्ने यांनी विकेट घेतल्या. त्याआधी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडचा संघ या फॉरमॅटमध्ये पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. दुबईत १४ नोव्हेंबरला विजेतेपदाचा सामना रंगणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video t20 world cup eng vs nz semi final match 2019 world cup final incident repeats abn