Virat Kohli Viral Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना मंगळवारी (२४ जानेवारी) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना ९० धावांनी जिंकून न्यूझीलंडवर सलग तिसरा विजय मिळवला. इंदूरमधील विजयासह, भारताने केवळ किवींचा व्हाईटवॉश केला नाही तर आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला. यजमानांसाठी, कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचा सलामीचा जोडीदार शुबमन गिल यांनी प्रत्येकी शतक झळकावून एकूण ३८५ धावा केल्या. ३८६ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना अवघ्या २९५ धावांवरच न्यूझीलंडचा खेळ आटोपला.
दरम्यान, शुबमन गिलची खेळी या सामन्यात भाव खाऊन गेली. २३ वर्षीय क्रिकेटर सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना, प्रेक्षकांमध्ये शुबमन ऐवजी साराची जास्त चर्चा झाली होती. प्रेक्षकांनी “हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो” असे म्हणत शुबमनला चिडवायला सुरु केले होते. साराच्या नावाचा जप करणाऱ्या चाहत्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर, आणखी एक व्हिडिओ देखील चर्चेत आहे, ज्यामध्ये चाहत्यांना विराट कोहलीने या चिडवण्यावर कशी प्रतिक्रिया दिली हे दिसत आहे.
विराट फिल्डिंग करत असताना शुबमनला चिडवण्यासाठी साराच्या नावाचा जप करणाऱ्या चाहत्यांना आणखी ओरडा असे सांगत होते. यावेळी विराटच्या चेहऱ्यावरचं हसू कॅमेऱ्याने टिपलं आहे.
हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो
शुबमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत तिन्ही सामन्यांमध्ये एकूण ३६० धावा करून प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपल्या नावे केला. शुबमन गिलचे नाव बॉलीवूड अभिनेता सारा अली खान आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर यांच्याशी जोडले जाते. आता यावेळी चाहते नेमक्या कोणत्या साराच्या नावाने शुबमन गिलला चिडवत आहेत, हे त्यांनाच माहित!
दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात किवी संघाच्या डेव्हॉन कॉनवेने किवींना दिलासा देणारा विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांच्या प्रत्येकी तीन विकेट्समुळे भारताने ९० धावांनी विजय मिळवला.