भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं प्राणीप्रेम हे सर्वश्रुत आहे. कित्येकदा क्रिकेटमधून रिकामा वेळ मिळाल्यावर धोनी आपल्या घरी लाडक्या कुत्र्यांसोबत वेळ घालवतो. सोशल मीडियावर धोनीचे आपल्या कुत्र्यांसोबतचे अनेक फोटो त्याच्या चाहत्यांनी पाहिलेले आहेत. सध्या न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी तयारी करतो आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर धोनी सध्या फावल्या वेळेत, आपल्या रांची येथील फार्म हाऊसवर ‘झोया’ आणि ‘लिली’ या दोन कुत्र्यांसोबत वेळ घालवतो आहे. आपल्या लाडक्या ‘झोया’ला खास ट्रेनिंग देतानाचा व्हिडीओ धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
या व्हिडीओत धोनी आपल्या कुत्र्याला अडथळ्याची शर्यत पार करायला लावताना दिसतो आहे. सध्या या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. धोनीने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अवघ्या ३० मिनीटांत या व्हिडीओला २ लाखापेक्षा जास्त लोकांनी आपल्या पसंतीची पावती दिली.
अवश्य वाचा – निवृत्तीचा सल्ला देणाऱ्यांना धोनीने दिले उत्तर
सध्या धोनीचं संघातलं स्थान हे धोक्यात आलेलं आहे. अनेक माजी खेळाडू धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये आता नवोदितांना संघात जागा द्यावी असं म्हणत आहेत. मात्र विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी धोनीला आपला पाठींबा दर्शवला आहे. काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत धोनीने आपल्या कुत्र्यांवरचं प्रेम जगजाहीर केलं होतं. माझ्याकडून सामन्यात चांगला खेळ होवो अथवा वाईट, माझ्या घरातले कुत्रे माझ्यावर आधीसारखचं प्रेम करतात. त्यामुळे मी भावनिकदृष्ट्या त्यांच्याशी जोडला गेलो असल्याचंही धोनीने बोलून दाखवलं होतं. उद्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ३ कसोटी सामन्यांची मालिका संपेपर्यंत धोनीकडे आपल्या लाडक्या कुत्र्यांचे लाड करण्यासाठी पुरेसा वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही.
अवश्य वाचा – धोनीवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या करिअरकडे बघावे : रवी शास्त्री