Smruti Mandhana on KBC Progaram: भारतीय महिला क्रिकेट स्टार स्मृती मानधनाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. कधी ती तिच्या फलंदाजीसाठी तर कधी तिच्या ग्लॅमरमुळे चर्चेत असते. या महिला सलामीवीर फलंदाजाने टीम इंडियासाठी आतापर्यंत ६ कसोटी, ८० एकदिवसीय आणि १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि सर्व फॉरमॅटमध्ये ६००० हून अधिक धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी सामन्यात, मानधनाने ७४ आणि नाबाद ३८ धावा केल्या, ज्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पहिला विजय नोंदवण्यात मदत झाली. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडमध्ये मानधना अलीकडेच दिसली होती. तिच्याबरोबर इशान किशनही उपस्थित होता. मात्र, इथे चाहत्याने स्मृती मानधनाला असा प्रश्न विचारला जो तिच्यावर बाऊन्सर असल्यासारखा होता, मात्र तिने या प्रश्नाचे चोख उत्तर दिले.
कार्यक्रमादरम्यान एका चाहत्याने विचारले, “स्मृती मॅडम, इन्स्टाग्रामवर तुमचे बरेच पुरुष फॉलोअर्स आहेत. पुरुषांमध्ये तुम्हाला कोणता गुण आवडतो? तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे?” हा प्रश्न ऐकून अमिताभ बच्चन आणि इशान किशन यांनाही आश्चर्य वाटले. इशानला हसू आवरता आले नाही, तर अमिताभ यांनी चाहत्याला पुढे विचारले, “तुझे लग्न झाले आहे का?” त्याचवेळी इशान किशनने टोमणा मारला म्हणाला, “हा प्रश्न एकदम गुगली असा होता सर.”
अमिताभ यांच्या प्रश्नावर चाहता म्हणतो, “नाही सर. म्हणूनच मी विचारतोय.” यानंतर अमिताभ स्मृतीकडे वळतात आणि तिला उत्तर द्यायला सांगतात. भारताची स्टार क्रिकेटर स्मृती म्हणते, “मला अशा प्रश्नाची अपेक्षा नव्हती. चांगला मुलगा असणं खूप गरजेचं आहे. त्याने माझ्या खेळाची काळजी घ्यावी आणि मला समजून घ्यावे. हे दोन विशेष गुण त्याच्यात असले पाहिजेत. कारण एक महिला क्रिकेटर असल्याने मी त्याला इतका वेळ देऊ शकणार नाही. त्याला हे समजले पाहिजे आणि त्याने या गोष्टीचा आदर केला पाहिजे. या दोन सर्वोच्च प्राधान्य असलेल्या गोष्टी आहेत. हेच गुण मी माझ्या होणाऱ्या जोडीदारात शोधत आहे.”
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. वन करेन, तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टी-२० मालिकेत संघाला २-१ असा पराभव पत्करावा लागला होता, पण भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग कसोटी सामने जिंकून इतिहास रचला. भारत प्रथम २८ डिसेंबर, ३० डिसेंबर आणि २ जानेवारीला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. सर्व सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. नवी मुंबईत ५, ७ आणि ९ जानेवारीला तीन टी-२० सामने होणार आहेत.
एकदिवसीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग.ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा आणि हरलीन देओल.
टी–२० संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग.ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्रकार, कनिका आहुजा आणि मिन्नू मणी.