गोरेगावच्या प्रबोधन येथे आयोजित २५व्या रौप्यमहोत्सवी मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेत पुरुष विभागात विहंगने तर महिलांमध्ये शिवभक्तने जेतेपदावर नाव कोरले. पुरुष विभागाच्या अंतिम लढतीत विहंगने महात्मा गांधी संघावर १ गुण आणि ५.१० मिनिटे राखून मात केली. विहंगतर्फे महेश शिंदेने पहिल्या डावात २.४० मिनिटे संरक्षण केले. प्रताप शेलारने १.५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी टिपले. मनोज पवारने ४ गडी टिपले. महिला गटात बदलापूरच्या शिवभक्त क्रीडा मंडळाने महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीचा ३ गुणांनी पराभव करत जेतेपद पटकावले. मध्यंतराला ३ गुणांची आघाडी घेत शिवभक्तने पहिल्या सत्रातच सामन्यावर पकड मिळवली. शिवभक्तच्या कविता घाणेकरने ३ मिनिटे तर प्रियांका भोपीने ३.५० मिनिटे संरक्षण करत शिवभक्तचा विजय साकारला. पुरुष विभागात विष्णू मांजरेकर सवरेत्कृष्ट संरक्षक तर अनिल पिसाळ सवरेत्कृष्ट आक्रमकपटू ठरला. सवरेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा मान महेश शिंदेने पटकावला. महिला गटात कविता गोलांवडे सवरेत्कृष्ट संरक्षक तर मयुरी पेडणेकर सवरेत्कृष्ट आक्रमकपटू ठरली. कविता घाणेकर सवरेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरली. व्यावसायिक गटात सवरेत्कृष्ट संरक्षक म्हणून विलास करंडेची तर सवरेत्कृष्ट आक्रमकपटू म्हणून मनोज पवारची निवड झाली. अमोल जाधव सवरेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरला.